सीमावाद आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्याचा चीनचा मानस या प्रश्नांना अनुसरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा चीन दौरा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा दौरा संपूर्ण आशियासाठी नवे मापदंड ठरविणारा असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणून मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. या तीन दिवसीय दौऱयामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची शियान या ऐतिकासिक चिनी शहरामध्ये भेट घेणार आहेत. याआधी क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱयादरम्यान मोदी यांनी जिनपिंग यांचे अहमदाबादमध्ये स्वागत केले होते. या पार्श्वभूमीवर राजनैतिक शिष्टाचार बाजूला ठेवून मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यात भेट होईल.
“चीन दौऱयासाठी अतिशय उत्सुक असून २१ वे शतक हे आशियाचे शतक आहे. माझ्या चीन भेटीमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ होतीलच त्यासोबत हा दौरा आशियाई आणि विकसनशील देशांसाठी नवे मापदंड ठरवेल.” असे मोदींनी चिनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधात गेल्या काही वर्षांत चांगली प्रगती झाली आहे. तसेच दोन्ही देशांनी मोठ्या संयम आणि परिपक्वतेने समस्यांना तोंड दिले असल्याचेही मोदी पुढे म्हणाले.