शाळा, दुकाने आणि बँका सुरू

नागालँडची राजधानी हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, शाळा, दुकाने आणि बँका सुरू झाल्या आहेत. दोन दिवसापूवीं हिंसक झालेल्या समूहाने येथे मोठय़ा प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली होती. त्यामुळे दोन दिवस शाळा आणि इतर व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.

पाच दिवसांचा बंद पुकारलेल्या व्यापाऱ्यांनी  आपली दुकाने पुन्हा सुरू केल्याने पेट्रोल पंप, दुकाने आणि बाजारपेठांमध्ये जनतेने खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.

नगरपालिकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या नागालँड सरकारच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या आदिवासी गटांनी १ फेब्रुवारीला बंदची हाक दिली होती. ३१ जानेवारीच्या रात्री दिमापूर येथे आंदोलनादरम्यान पोलीस गोळीबारामध्ये दोन नागा तरुणांचा मृत्यू झाला होता. या युवकांचे मृतदेह दिमापूरहून कोहिमा येथे नेण्यात आले होते. आणि त्यानंतर शहराच्या मध्यभागी ठेवण्यात आले होते.

मंत्रिमंडळ बरखास्तीची मागणी

आंदोलन करणाऱ्या संघटनांनी अनेक मागण्या केल्या असून, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ बरखास्त करावे, निवडणूक प्रक्रिया रद्द करावी आणि दिमापूर गोळीबारामध्ये सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि जवानांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल सेवा ठप्प

राज्याच्या काही भागांमध्ये अजूनही प्रतिबंधात्मक आदेश लागू असून, शनिवारी सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. सरकारी वाहने रस्त्यावर उतरवण्यास मनाई करण्यात आली असून, मोबाइल आणि इंटरनेट सेवा अजूनही बंद ठेवण्यात आल्या आहेत.