नायब राज्यपाल नजीब जंग व आम आदमी पक्षात संघर्ष तापला’; सत्ताधाऱ्यांची नाराजी

दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुनियाची जोरदार साथ पसरली असून आता त्यावरून नायब राज्यपाल नजीब जंग आणि दिल्लीचे सरकार यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

डेंग्यू आणि चिकुनगुनियाची साथ पसरल्याने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपला फिनलंडचा दौरा आटोपता घ्यावा आणि दिल्लीत परतावे, असा आदेश नजीब जंग यांनी सिसोदिया यांना दिला. तर शहरातील आरोग्यविषयक प्रश्नांची जंग गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप आप सरकारने केला.

जंग यांच्या आदेशानंतर आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि जलमंत्री कपिल मिश्रा यांनी जंग यांच्या कार्यालयात जाऊन शनिवारी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र जंग हे कार्यालयात नसल्याने ही चर्चा होऊ शकली नाही.

नायब राज्यपाल शनिवारी रजेवर असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. दिल्लीत इतकी मोठी आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेली असताना राज्यपाल रजेवर कसे जाऊ शकतात, असा सवाल या मंत्र्यांनी केला. सिसोदिया यांना तातडीने फॅक्सद्वारे संदेश पाठविण्यात आला, त्यामुळे आम्ही जंग यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, असे मिश्रा म्हणाले. त्यामुळे आता दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. डेंग्यू आणि चिकुनगुनियाची साथ पसरलेली असताना जंग १० दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते त्याच संदर्भ जैन यांनी दिला. जंग यांनी आपला दौरा एक तासही आटोपता घेतला नाही, असे जैन म्हणाले. शहरात आरोग्यविषयक समस्या भेडसावत असताना आप सरकार त्याला राजकीय रंग देत असल्याचा आरोप जंग यांच्या कार्यालयाने केला आहे.

जंग यांनी सिसोदिया यांना तातडीने फॅक्सद्वारे आदेश दिल्याने काहीतरी महत्त्वाची चर्चा करावयाची असेल असा समज होऊन आम्ही जंग यांन भेटावयास आलो होतो, मात्र ते कार्यालयात नव्हते, त्यामुळे दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता ते निवासस्थानीही नव्हते, असे मिश्रा म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या घशाच्या शस्त्रक्रियेनंतर बंगळुरूतील रुग्णालयात उपचार घेत आहेत.