Narendra Modi : ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत १६ तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत विविध सूर समोर आले. ऑपरेशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं हे खोटं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगावं असं आव्हान राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात दिलं. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले. जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा असं आपल्याला सांगितलेलं नाही असं मोदी यांनी लोकसभेत स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उत्तर दिलं. १० मे रोजी शस्त्रविराम झाला. ९ मेच्या रात्री काय घडलं ते नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितलं.

पाकिस्तानला आपण चोख उत्तर दिलं

काही लोकांना जाणीवपूर्वक गोष्टी विसरायची आहेत त्याला आपण काय करणार? ६ आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवलं. ७ मेच्या सकाळी लष्कराने स्पष्ट सांगितलं होतं की आमचं लक्ष्य आहे दहशतवादी आणि त्यांचे आका तसंच त्यांचे दहशतवादी तळ. आपण आपलं लक्ष्य गाठलं असं लष्कराने स्पष्ट केलं. ६ मे रोजी ऑपरेशन सिंदूर पार पडलं. भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानच्या सैन्याला काही मिनिटांनी लक्ष्य काय होतं आहे ते सांगितलं. त्यांच्या मनात काय चाललं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे यासाठी हे सांगितलं. पाकिस्तान निर्ल्लजपणे दहशतवाद्यांसह उभा राहिला. आपली तयारी पूर्ण होती, आपण संधीची वाट बघत होतो. पाकिस्तानने दहशतवाद्यांची मदत केली आणि मैदानात उतरले, तेव्हा वर्षानुवर्षे लक्षात राहिल असं उत्तर आपण त्यांना दिलं.

९ मे च्या मध्यरात्री काय घडलं?

९ मेच्या मध्यरात्री आपल्या देशाची मिसाईल्सने पाकिस्तानवर प्रचंड प्रहार केला. ज्यामुळे पाकिस्तान गुडघ्यांवर आला. जगातल्या एकाही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवा हे सांगितलं नाही. ९ मे च्या रात्री अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी मला फोन केले. तासभर ते फोन करत होते. पण मी लष्करासह बैठकीत होतो. मी त्यांना फोन केला आणि विचारलं तुमचा फोन तीन ते चार वेळा आला होता काय झालं? व्हान्स यांनी मला फोनवर सांगितलं पाकिस्तान तुमच्यावर खूप मोठा हल्ला करणार आहे. त्यावर मी त्यांना स्पष्ट केलं जर पाकिस्तान मोठा हल्ला करणार असेल तर त्यापेक्षा मोठा हल्ला आम्ही करु असं मी त्यांना सांगितलं. आम्ही त्यांना गोळीचं उत्तर तोफगोळ्याने देऊ. हे मी व्हान्स यांना सांगितलं. असं मोदी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते-मोदी

आपल्या लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला काँग्रेसने पुरावे मागितले. नंतर त्यांना कळलं की आपलं चुकलं मग म्हणू लागले सर्जिकल स्ट्राईकमध्ये विशेष काय आहे? आमच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले. कुणी सांगितलं २ सर्जिकल स्ट्राईक झाले, कुणी सांगितलं ४ सर्जिकल स्ट्राईक झाले कुणी सांगितलं १५ सर्जिकल स्ट्राईक साजरे केले. जेवढा मोठा नेता तेवढी ही संख्या वाढत होती. आपल्या वायुदलाने एअर स्ट्राईक केला तेव्हा यांनी पुरावे मागितले. आता ऑपरेशन सिंदूरलाही नावं ठेवणारे हेच लोक आहेत. ऑपरेशन सिंदूर झालं हेच आधी मान्य करायला तयार नव्हते, आता विचारत आहेत ऑपरेशन सिंदूर थांबवलं का? असाही टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला