चांद्रयान २ मधून प्रेरणा; ‘नासा’कडून भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक
चांद्रयान २ मोहिमेतून अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेलाही प्रेरणा मिळाली आहे. यापुढे इस्रोसमवेत सौर मालेचे संशोधन करण्यासाठी संयुक्त संशोधन मोहिमा राबवण्यास आम्ही तयार आहोत, असे नासाने स्पष्ट केले.
चांद्रयान २ या मोहिमेत भारताने केलेल्या कामगिरीचे नासाने कौतुक करताना म्हटले आहे,की अवकाश मोहिमा कठीणच असतात. चांद्रयान २ मोहिमेत यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते पण त्यात अपयश आले असले तरी जो टप्पा गाठला गेला तेही काही कमी महत्त्वाचे नाही.
ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकारी अलाइस जी वेल्स यांनी सांगितले, की चांद्रयान २ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न हे मोलाचे आहेत. त्यासाठी इस्रोचे आम्ही अभिनंदन करतो. भारतासाठी हे मोठे पाऊल आहे. वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली बरीच माहिती यातून निर्माण होणार आहे. भारत त्याच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
नासाचे माजी अवकाशवीर जेरी लिनेन्गर यांनी असे म्हटले आहे, की भारताने चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा होता. त्यात अपयश आले असले तरी या अनुभवाचा फायदा पुढील मोहिमात होणार आहे, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. भारताने अतिशय अवघड अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लँडर चांद्रभूमीवर उतरत असताना सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित पार पडले पण नंतर ते नियंत्रणाबाहेर गेले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
चांद्रयान २ चे उड्डाण २२ जुलै रोजी झाल्यानंतर ते ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न शनिवारी अपयशी ठरला होता. १९५८पासून आतापर्यंत १०९ चांद्र मोहिमा झाल्या, त्यातील ६१ यशस्वी झाल्याचे नासाच्या मून फॅक्टशीटमध्ये म्हटले आहे. चांद्रवतरणाच्या केवळ ३१ टक्के मोहिमा आतापर्यंत यशस्वी झाल्या आहेत.
चांद्रयान २ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न हे मोलाचे आहेत. त्यासाठी इस्रोचे आम्ही अभिनंदन करतो.
-अलाइस जी वेल्स, ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी
