कॅनडामध्ये खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा सनसनाटी आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय पेच निर्माण झाला आहे. कॅनडाने केवळ आरोप न करता भारताच्या ओटावा वकिलातीमधील एका अधिकाऱ्याला ‘रॉ’चा स्थानिक प्रमुख असल्याचा आरोप करत मायदेशी पाठविले आहे. या घटनेमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घडामोडीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने बुधवारी कॅनडाशी संबंध असणाऱ्या ४३ दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी केला आहे. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबतची माहिती लोकांनी एनआयएला द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. ही संपत्ती केंद्र सरकारकडून ताब्यात घेतली जाऊ शकते.

एनआयएने ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई, जसदीप सिंग, काला जथेरी उर्फ संदीप, वीरेंद्र प्रताप उर्फ काला राणा आणि जोगिंदर सिंग यांच्यासह इतरही सर्व गुन्हेगारांचा तपशील छायाचित्रांसह जारी केला आहे. यातील अनेक गुंड कॅनडात स्थायिक असल्याचं ‘एनआयए’च्या निवेदनात म्हटलं आहे.

त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालकीची संपत्ती किंवा व्यवसायाचा तपशील कुणाला माहीत असल्यास याबाबतची माहिती आम्हाला द्यावी, अशी विनंती एनआयएकडून करण्यात आली आहे. ‘एनआयए’ने ७२९०००९३७३ हा व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National investigation agency nia releases details of 43 gangsters and terrorists linked to canada rmm