पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या तपासाकरता रविवारी भारतात येणार असलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाच्या (जेआयटी) पाच सदस्यांना भारताने शुक्रवारी व्हिसा जारी केला. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
पठाणकोट हल्ल्याबाबतचा पुरावा मिळवण्यासाठी भारतात येणार असलेल्या पाच पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आम्ही व्हिसा जारी केला आहे, असे येथील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले. जेआयटीचे पाच सदस्य २७ मार्चला भारतात जाणार आहेत.
पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाचे (सीटीडी) प्रमुख व अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मोहम्मद ताहीर राय यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांच्या या पथकात लष्करी गुप्तचर विभाग आणि नागरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुप्तचर विभागाचे लाहोर येथील उपमहासंचालक मोहम्मद अझीम अर्शद, आयएसआयचे लेफ्टनंट कर्नल तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर विभागाचे ले.क. इरफान मिर्झा आणि गुजरानवाला येथील सीटीडीचे तपास अधिकारी शाहीद तन्वीर हे पथकातील इतर ४ सदस्य आहेत.
एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरता पाकिस्तानच्या गुप्तचर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी वापरलेल्या शस्त्रांची तपासणी आणि हल्ल्याची झळ पोहचलेल्यांचे बयाण नोंदवणे ही कामे हे पथक करण्याची अपेक्षा असल्याचे पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
यापूर्वी भारताने दिलेल्या माहितीच्या आधारे प्राथमिक तपासासाठी पाकिस्तानने सहा सदस्यांचे एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ndia issues visa to 5 member pakistan pathankot probe team