NDTV चे अँकर आणि पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यम विश्वात आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अदानी समूहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी एनडीटीव्हीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ रवीश कुमार यांनीही राजीनामा दिल्याची माहिती एनडीटीव्हीकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांच्या फॉलोअर्सकडून सोशल मीडियावर एनडीटीव्ही व्यवस्थापनाचा निषेध केला जात आहे. त्यात आता राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच रवीश कुमार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवीश कुमार हे गोल्या २६ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संलग्न होतं. १९९६ साली पहिल्यांदा त्यांचा एनडीटीव्हीशी संपर्क आला. तेव्हापासून त्यांनी आपली पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजातून मोठा पाठिंबा मिळवला. सामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. ‘रवीश की रिपोर्ट’ किंवा ‘प्राईम टाईम’ शोच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडली. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे माध्यम विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

रवीश कुमार यांचं ट्वीट!

राजीनाम्यानंतर रवीश कुमार यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्वीटच्या शेवटी त्यांनी नेहमीप्रमाणे ‘आपका रवीश कुमार’ असं नमूद केलं आहे. या ट्वीटमध्ये NDTV चा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधणार आहेत, त्याविषयीही त्यांनी माहिती दिली आहे.

पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली

“माननीय जनता, माझ्या असण्यामध्ये तुम्हीही सहभागी आहात. तुमचं प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे. आत्तापर्यंत तुम्हा प्रेक्षकांशी प्रदीर्घकाळ आणि एकतर्फी संवाद साधला आहे. आता माझ्या यूट्यूब चॅनलवर. हाच माझा नवा पत्ता आहे. सर्वांना गोदी मीडियाच्या गुलामीशी लढा द्यायचा आहे”, असं रवीश कुमार यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये रवीश कुमार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंकदेखील शेअर केली आहे.

अदानी समूहाने एनडीटीव्हीचे मालकीहक्क घेण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली. त्यानंतर प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याबाबत अधिकृत भूमिका समोर येत नव्हती. अखेर बुधवारी त्या दोघांनीही राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार यांनीही राजीनामा दिल्याचं एनडीटीव्हीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ndtv adaani takeover anchor ravish kumar resigned after pranoy roy radhika pmw
First published on: 01-12-2022 at 11:10 IST