Donald Trump aide Howard Lutnick new threat to india : भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापार वाटाघाटी सुरू आहेत, यादरम्यान अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा नव्याने इशारा दिला आहे. ट्रम्प प्रशासनातील अमेरिकेचे वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक यांनी भारताला ‘वठणीवर आणण्याची’ आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी इशारा दिला आहे की, जर भारताला अमेरिकन ग्राहकांना वस्तू विकायच्या असतील तर त्यांना राष्ट्राध्यक्षांशी (डोनाल्ड ट्रम्प) जुळवून घ्यावेच लागेल.

भारत आणि ब्राझील या देशांवर निशाणा साधत डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी लुटनिक म्हणाले की, या देशांनी त्यांची बाजारपेठ आणखी खुली करण्यासाठी आणि अमेरिकेच्या हितांना बाधा पोहोचवणारे निर्णय घेणे थांबवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

अमेरिकेचे वाणिज्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“आपल्याकडे काही देश आहेत ज्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे, जसे की स्वित्झर्लंड, ब्राझील, भारत – हे असे देश आहेत ज्यांनी खरंच अमेरिकेला योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे. त्यांनी त्यांच्या बाजारपेठा खुल्या कराव्यात, अमेरिकेला नुकसान पोहोचवतील असे निर्णय घेणे थांबवावे, आणि याच कारणामुळे आमचे त्यांच्याशी मतभेद आहेत,” असे लुटविक न्यूजनेशनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

अमेरिकेने भारतावर सर्वाधिक टॅरिफ लादले आहे, भारतातून आयात होणाऱ्या मालावर ट्रम्प प्रशासनाने काही वस्तूंवर लादलेले शुल्क ५० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. यानंतर काही दिवसांपूर्वी ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधी उत्पादनांवर १०० टक्के शुल्क लावण्यात आले आहे, ज्यामुळे भारतीय कंपन्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. भारतातील औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे साधारणपणे ४० टक्के उत्पन्न हे अमेरिकन बाजारपेठेतून येते.

लुटविक यांच्या मते, “या देशांनी (भारत आणि ब्राझिल) लक्षात घेणे आवश्यक आहे की, जर तुम्हाला अमेरिकन ग्राहकांना मालाची विक्री करायची असेल तर तुम्हाला अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर जुळवून घ्यावे लागेल.”

या सर्व घडामोडींदरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या आहेत. भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान वॉशिंग्टनला भेट दिली. या भेटी दौऱ्यामध्ये त्यांनी यूस ट्रेड रिप्रसेंटेटिव्ह अॅम्बेसिडर जेमिसन ग्रीर आणि भारतासाठीचे अॅम्बेसिडर- सर्जिओ गॉर यांच्याशी संभाव्य करारावर चर्चा केली.