वृत्तसंस्था, काठमांडू
नेपाळची राजधानी काठमांडू सोमवारी निदर्शनांनी हादरली. या निदर्शनांमध्ये किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील ही अलिकडील काळातील सर्वात हिंसक निदर्शने असल्याचे सांगण्यात आले. समाजमाध्यमांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात काठमांडूमधील मैतीघर मंडाला येथून निदर्शनांना सुरुवात झाली. पार्लमेंटच्या जवळ आल्यानंतर निदर्शकांनी बॅरिकेड्स तोडले आणि ते पार्लमेंटच्या आवारात शिरले आणि निदर्शनांना हिंसक वळण लागले.
हिमालयन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला शांततापूर्ण निदर्शनांची घोषणा करण्यात आली होती. मात्र, निदर्शक पार्लमेंटच्या आवारात शिरल्यानंतर तिथे त्यांचा पोलिसांबरोबर संघर्ष झाला. संतप्त निदर्शकांनी रुग्णवाहिकेला आग लावली, दंगल आटोक्यात आणणाऱ्या पोलिसांवर दगड आणि इतर वस्तूंनी हल्ला करण्यात आला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर, रबरी गोळ्या अशी आयुधे वापरली. त्यामुळे निदर्शक अधिक बिथरले आणि संघर्ष वाढला. त्यानंतर काठमांडू जिल्हा प्रशासन कार्यालयाने संवेदनशील सरकारी इमारतींच्या भोवती असलेल्या बनेश्वर, सिंहदरबार, नारायणहिती या महत्त्वाच्या भागांमध्ये संचारबंदी लागू केली.
सुरुवातीला काठमांडूमध्ये सुरू झालेली ही निदर्शने महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांच्या परिसरात आणि पोखरा, बिराटनगर आणि भरतपूर या शहरांमध्येही पसरली. निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या हजारो युवकांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. ‘जेन झी’अंतर्गत (वयोगट १५ ते ३० वर्षे) ही निदर्शने करण्यात आली.
समाजमाध्यमांची लोकप्रियता
नेपाळमध्ये इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा प्रचंड वापर होतो. तेथील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ऑनलाईन असल्याची आकडेवारी आहे. नेपाळच्या लोकसंख्येत १६ ते २५ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण २०.८ टक्के आहे. विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या समाजमाध्यांचा ते भरपूर प्रमाणात वापर करतात. त्याबरोबरच एक्स, रेडइट, लिंक्डइन, पिंटरेस्ट, सिग्नल, वीचॅट यांच्यासह २६ समाजमाध्यमांवर बंदी आल्यामुळे या तरुणांच्या थेट दैनंदिन जीवनावरच परिणाम झाला आणि ते संतप्त झाले. टिकटॉकने सरकारी नियमनांचे पालन केल्यामुळे त्यांच्यावर बंदी नाही.
सीमेवरील परिस्थितीवर भारताचे लक्ष
नवी दिल्ली : या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ सीमेलगत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नेपाळ सीमेचे संरक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बल (एसएसबी) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून भारताच्या भूभागात निदर्शनांचे लोण पसरू नये यासाठी खबरदारी घेत आहोत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘एसएसबी’ने दिलेला इशारा सध्या प्रतिबंधात्मक स्वरूपाचा असून परिस्थिती नियंत्रणात आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेवर पुरेसे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच, सीमेवरील विविध तपासणी नाक्यांवर कठोर तपासणी केली जात आहे. सुरक्षा कायम राखून नागरिकांना सीमा सुरळीतपणे ओलांडता यावी यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबर समन्वय वाढवण्यात आली आहे, असे अधिकारी म्हणाले. भारत-नेपाळ सीमा खुली असून ती १,७५१ किमी लांबीची आहे. उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमधून ही सीमा जाते. सीमेवर निर्बंध नसल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान घनिष्ट सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्याचवेळी नेपाळमध्ये कोणतेही राजकीय अस्थैर्य किंवा निदर्शने झाली की सीमेवर सुरक्षा वाढवण्याची खबरदारी घेतली जाते.