वॉशिंग्टन : इस्रायलने १२ दिवस केलेले हल्ले आणि अमेरिकेच्या रविवारच्या हल्ल्यांनंतर इराणची अण्वस्त्रनिर्मिती क्षमता नष्ट झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी केला. ‘आयएईए’च्या माजी अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला. तर युद्धविरामाची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘इराण पुन्हा कधीही अण्वस्त्रनिर्मिती क्षमता आत्मसाद करू शकणार नाही,’ असा दावा केला.

समृद्ध युरेनियमचे रुपांतर अण्वस्त्रांमध्ये करणारी इराणची ‘सेंट्रिफ्युज यंत्रणा’ इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये नष्ट झाली असावी असे मत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे (आयएईए) माजी निरीक्षक डेव्हिड अल्ब्राइट यांनी ‘सीएनएन’शी बोलताना व्यक्त केले. उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांचे निरीक्षण करून आणि सूत्रांककडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर इस्रायलचे युद्धाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे, असा दावा करत आपण युद्धविराम मान्य केल्याचे नेतान्याहू यांनी जाहीर केले. इराणचा अणुकार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रनिर्मितीचा कार्यक्रम नष्ट करणे हेच आमचे ध्येय होते, असे त्यांनी सोमवारी रात्री सुरक्षा कॅबिनेटमध्ये सांगितले.

इराण पुन्हा कधीही अणुकेंद्र उभारणार नाही. ती डोंगराखालील जागा उद्ध्वस्त झाली आहे. बी-२ वैमानिकांनी त्यांचे काम फत्ते केले आहे. कोणी कल्पनाही केली नव्हती इतके चांगले काम त्यांनी केले. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

युद्ध आणि युद्धविराम

● युद्धविरामापूर्वी मंगळवारी इस्रायलच्या हल्ल्यामध्ये उत्तर इराणमधील गिलान प्रांतामध्ये नऊजण ठार झाल्याचे सांगण्यात आले. हा भाग कॅस्पियन समुद्राला लागून आहे.

● इस्रायलने एव्हिन तुरुंगावर हल्ला केल्यानंतर तेथील सर्व कैद्यांना दुसरीकडे हलवण्यात आले असे इराणने सांगितले. एव्हिन तुरुंगाच्या डागडुजीसाठी हा निर्णय घेतल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. एव्हिन तुरुंगात राजकीय तसेच पाश्चात्त्य देशांशी संबंधित कैद्यांना ठेवले जाते.

● इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे बहुतांश समृद्ध युरेनियम नष्ट झाल्याचे इस्रायलमधील विरोधी पक्षनेते येयर लॅपिड यांनी ब्रिटनच्या खासदारांना सांगितले. मात्र, काही साठा अजूनही शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. ● कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना समन्स बजावले आणि सोमवारी रात्री अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेला हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायदा, तसेच कतारचे सार्वभौमत्व व हवाई हद्दीचे उल्लंघन असल्याचे त्यांना निक्षून सांगितले.