न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रसंघामध्ये (यूएन) आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेचा धनी झालेल्या इस्रायलने शुक्रवारी ‘यूएन’मध्ये पुन्हा एकदा ‘हमास’विरोधातील राग आळवला. ‘हमासविरोधातील कर्तव्य इस्रायलने पूर्ण केलेच पाहिजे,’ असे उद्गार इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘यूएन’च्या सर्वसाधारण सभेत काढले. दरम्यान, नेतान्याहू यांना विरोध करण्यासाठी त्यांनी भाषण सुरू करताच विविध देशांच्या शिष्टमंडळांनी सभात्याग केला.
नेतान्याहू म्हणाले, ‘पाश्चिमात्य देश कदाचित दबावाखाली वाकले असावेत. मी तुम्हाला एका गोष्टीची हमी देतो, इस्रायल असे वाकणार नाही.’ विविध देशांनी पॅलेस्टाइनला मान्यता दिल्याबद्दल नेतान्याहू म्हणाले, ‘तुमच्या या लज्जास्पद निर्णयाने ज्यूविरोधातील आणि जगभरातील निरपराध नागरिकांविरोधातील दहशतवादाला प्रोत्साहन मिळेल.’ ‘ज्यू-विरोध मरणे कठीण आहे. पश्चिम आशियातील बदलांनी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. इस्रायलने सीरियाबरोबर सुरक्षेच्या संदर्भातील नियोजनासाठी चर्चा सुरू केली आहे.’ दरम्यान, इस्रायलमध्ये नेतान्याहू यांचे भाषण सर्वांनी ऐकावे, यासाठी इस्रायल-गाझा सीमेवर ध्वनिवर्धक लावले होते.
नेतान्याहू यांना सभागृहात विरोध
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी भाषणाला सुरुवात करताच विविध देशांचे प्रतिनिधी सभागृहाबाहेर गेले. अमेरिकेचे शिष्टमंडळ सभागृहातच राहिले. त्यांचे भाषण सुरू असताना सभागृहात गोंधळ सुरू होता. काही ठिकाणी नेतान्याहू यांच्या भाषणाला दाद मिळत होती. जे देश उपस्थित होते, त्यापैकी अमेरिका, ब्रिटनचे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.
‘क्यूआर कोड’ची चर्चा
इस्रायलवर हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याची चित्रफीत दाखविणाऱ्या व्हिडीओचा ‘क्यूआर कोड’ असलेली पिन नेतान्याहू यांनी भाषणादरम्यान लावली होती. इस्रायलच्या शिष्टमंडळानेही तशीच पिन लावली होती. याची चर्चा सगळीकडे झाली.