नोटाबंदीच्या निर्णयाला महिन्याभरापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. ३० डिसेंबरपर्यंत सर्वकाही सुरळीत होईल, असे पंतप्रधान मोदींकडून सांगण्यात आले होते. मात्र ३० डिसेंबरला आता तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेला असूनही देशभरात फक्त रद्द झालेल्या रकमेच्या ३३% नोटाच बाजारात आणण्यात सरकारला यश आले आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताच तब्बल साडे पंधरा लाख कोटी रुपये मूल्यांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. मात्र याबदल्यात आतापर्यंत फक्त ५ लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीच्या ३० दिवसानंतरही चलन संकटाची तीव्रता कायम आहे.

फक्त ५० दिवस कळ सोसा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना म्हटले होते. यातील ३० पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी संपलेला आहे. म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त अवधी संपुष्टात आला असून या दिवसांमध्ये फक्त एक तृतीयांश रकमेच्या नव्या नोटा बाजारात आणण्यात सरकारला यश आले आहे. त्यामुळे येत्या १८ दिवसांमध्ये सरकारला तब्बल दोन तृतीयांश नव्या नोटा बाजारात आणाव्या लागणार आहेत.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या देशभरात चार लाख कोटी रुपये चलनात आहेत. यातील पाच लाख रुपये किमतीच्या नोटा नव्या आहेत. तर दोन लाख कोटी रुपये नोटाबंदीच्या निर्णयाआधीपासूनच बँकांमध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासूनच्या ३२ दिवसांमध्ये लोकांनी १३ लाखांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या आहेत. साडेपंधरा लाख कोटी रुपये किमतीच्या नोटांपैकी १३ लाख कोटींच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. म्हणजेच जवळपास ८४% जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.’

पुढील २० दिवसांमध्ये नव्या नोटा चलनात आणून चलन संकटाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. साधारणत: ९ ते १० लाख कोटी रुपये चलनात असल्यास चलन तुटवडा आटोक्यात येईल, असा सरकारचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या १८ दिवसांमध्ये अडीच लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या देशभरात सात लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत.

‘सध्या रिझर्व्ह बँकेकडून दिवसाकाठी १२ हजार कोटी ते १५ हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा छापण्यात येत आहेत. छपाईचा हा वेग कायम राहिल्यास १२ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत जास्तीत जास्त २ लाख ८५ हजार कोटी रुपये, तर कमीत कमी २ लाख २८ हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा चलनात येऊ शकतात. त्यामुळे देशभरातील चलन संकट आटोक्यात येईल,’ अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना दिली.