टोल प्लाझावर गाडी थांबून पैसे भरण्यामध्ये जाणारा वेळ वाचावा, यासाठी FASTag तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, तरीही बरेच वाहनधारक आपल्या गाडीच्या विंडशील्डला FASTag जोडत नसल्यामुळे टोल प्लाझावर नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊनच आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवा नियम बनवला आहे. या नव्या नियमानुसार, जे वाहनचालक वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला FASTag जोडत नाहीत त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

हेही वाचा : Air India flight lands Russia : एअर इंडियाचं दिल्लीहून अमेरिकेला निघालेलं विमान रशियाकडे वळवलं! काय घडलं?

काय आहे नवा नियम?

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लागू केलेल्या नव्या नियमानुसार, वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला FASTag जोडणे बंधनकारक आहे. ज्यांच्या वाहनावर FASTag योग्य प्रकारे लावलेला नसेल अशांच्या खिशाला अधिक भुर्दंड बसणार आहे. FASTag योग्य प्रकारे लावलेला नसल्यामुळे टोल प्लाझावर नाहक विलंब होतो. टोलनाक्यांवर अशा वाहनचालकांमुळे होणारा विलंब थांबवण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. हायवेवरुन जाताना टोल आल्यानंतर सर्वच वाहनचालकांना विनाविलंब चांगला अनुभव प्राप्त व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

प्रमाणभूत कार्यपद्धती लागू

एनएचएआयचे म्हणणे आहे की फास्टॅग योग्य प्रकारे न लावल्याने टोल बूथवर ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे, इतर वाहनचालकांनाही विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. या नव्या नियमांनुसार, प्रमाणभूत कार्यपद्धतीही (SOP) तयार करण्यात आली आहे. ही प्रमाणभूत कार्यपद्धती सर्व टोल वसुली करणाऱ्या एजन्सींना सोपवण्यात आली आहे. याच प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार, जर गाडीच्या समोरच्या विंडशील्डच्या आतील बाजूस FASTag लावलेले नसेल तर अशा वाहनांना टोलचे शुल्क दुप्पट भरावे लागणार आहे.

हेही वाचा : वार्धक्याची चिंता, त्यात करोनाची भर! वाढत्या दबावानंतर निवडणुकीतून माघार घेण्याबाबत बायडन ‘पॉझिटीव्ह’

टोल नाक्यावर लावले जातील फलक

‘एनएचएआय’ला या नव्या नियमांबद्दल जागरूकता पसरवायची आहे. हा नवा नियम सर्वच वाहनचालकांना कळावा यासाठी त्यांनी सर्व टोलनाक्यांवर या नियमाची माहिती स्पष्टपणे देणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यास वाहनचालकांना दंड होऊ शकतो, असेही त्यामध्ये नमूद असणार आहे. ज्या वाहनांवर FASTags नसेल अशा वाहनांचे वाहन नोंदणी क्रमांक (VRN) रेकॉर्ड करण्यासाठी टोल प्लाझाकडून CCTV चा वापर योग्य प्रकारे करण्यात येणार आहे. या CCTV फुटेजमुळे आकारण्यात येणाऱ्या टोलच्या अचूक नोंदी ठेवण्यासही मदत होईल. या पार्श्वभूमीवर, ‘एनएचएआय’ने सध्याच्या नियमांनुसार FASTags समोरच्या विंडशील्डच्या आतील बाजूस असणे आवश्यक असल्याची आठवण सर्वांनाच करून दिली आहे. तसेच या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या वाहनांना इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनमधून (ETC) वगळून काळ्या यादीत टाकले जाण्याचाही धोका आहे.