भारताची गुप्तचर संस्था रॉच्या अधिकार्‍यांनी अमेरिकेतील खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप वॉशिंग्टन पोस्टने काही महिन्यांपूर्वी केला होता. याप्रकरणी निखिल गुप्ता नावाच्या एका भारतीय नागरिकावर आरोप करण्यात आले होते. तसेच निखिल गुप्ताला गेल्या वर्षी चेक रिपब्लिकमध्ये अटकही करण्यात आली होती. दरम्यान आता त्याला चेक रिपब्लिकमधून अमेरिकेत आणण्यात आलं आहे.

हेही वाचा – खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट ‘RAW’ अधिकार्‍याने रचल्याचा आरोप, कोण आहेत विक्रम यादव?

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ५२ वर्षीय निखिल गुप्तावर अमेरिकेतील खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याला गेल्या वर्षी चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. या मागणीला निखिल गुप्ताने विरोधही केला होता. मात्र, चेक रिपब्लिक सरकारने त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानुसार आता निखिल गुप्ताला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्याला सोमवारी अमेरिकेतील फेडरल न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, ही घटना अशावेळी समोर आली जेव्हा अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन हे भारत दौऱ्यावर आहेत. ते लवकर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याचा आरोप, मध्य प्रदेशात ११ घरांवर बुलडोझर; आधीच नोटीस दिल्याचा प्रशासनाचा दावा!

नेमकं प्रकरण काय?

गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट रॉच्या अधिकार्‍याने रचला होता, असा आरोप काही महिन्यांपूर्वी अमेरिकेकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आले होते. निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाने सीसी-१ (चीफ कॉन्स्पिरेटर) नावाच्या भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हे काम केले होते, असं या आरोपपत्रात म्हटलं होतं. तसेच विक्रम यादव आणि गुप्ता यांनी ऑनलाइन संभाषण करून पन्नूच्या हत्येची योजना आखली. त्यांच्या योजनेदरम्यान ते एका ड्रग्स आणि शस्त्राच्या व्यापार्‍याकडे पोहोचले होते, अशा दावाही या आरोपापत्रात करण्यात आला होता.