पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल केलेले डीएनए वक्तव्य मागे घ्यावे यासाठी जद(यू)ने मंगळवारी ‘शब्द वापसी’ मोहीम सुरू केली. नरेंद्र मोदी यांना डीएनए चाचणीच्या नमुन्यांसह सह्य़ांचे निवेदन पाठविण्यात येणार आहे.
जी व्यक्ती इतक्या उच्च पदावर आहे त्या व्यक्तीला अशा प्रकारे वक्तव्य करणे शोभादायक नाही, त्यामुळे आम्ही हा प्रश्न तडीस नेणार असे नितीशकुमार यांनी वार्ताहरांना शब्द वापसी मोहिमेची सुरुवात करताना सांगितले. वक्तव्य करण्यापूर्वी मोदी यांनी विचार करावयास हवा होता, परंतु आता त्यांनी डीएनए वक्तव्य करून बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना रोषाला सामोरे जावेच लागेल, असेही नितीशकुमार म्हणाले.