US President Donald Trump to Google, Microsoft: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताना ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा नारा दिला. यासाठी ट्रम्प विविध उपाययोजना आखत आहेत. आधी त्यांनी इतर देशांवर आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. त्यावर अजूनही वादविवाद सुरू आहे. त्यानंतर त्यांनी ॲपलसह इतर कंपन्यांना अमेरिकेतच कारखाने थाटण्यास सांगितले. आता त्यांनी गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला एक आवाहन केले आहे. ज्याचा फटका भारतीय टेक कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आयटी कंपन्यांनी भारत, चीन सारख्या देशातील नोकरभरती कमी करून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे. बुधवारी वॉशिंग्टन येथे झालेल्या एआय समिटमध्ये बोलत असताना ट्रम्प यांनी हे आवाहन केले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन कंपन्यांनी आता अमेरिकेतच रोजगार निर्मिती होईल, असे प्रयत्न करावेत. या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने उघडणे किंवा भारतीय टेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या पुरविण्याऐवजी अमेरिकेतील नागरिकांनाच काम देण्याचा प्रयत्न करावा.

एआय समिटमध्ये बोलत असताना ट्रम्प यांनी अमेरिकन आयटी कंपन्यांच्या जागतिक मानसिकतेच्या धोरणावर टीका केली. “कंपन्यांच्या जागतिक धोरणामुळे अमेरिकन नागरिक दुर्लक्षित राहिले. अमेरिकन स्वातंत्र्याचा वापर करून काही मोठ्या टेक कंपन्यांनी मोठा नफा कमावला, पण त्यांनी अमेरिकेबाहेर गुंतवणूक केली. आता माझ्या कार्यकाळात हे होऊ देणार नाही”, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “अनेक मोठ्या आयटी कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने थाटले, भारतातील कामगारांना नोकरी दिली आणि कमावलेला नफा आयर्लंडमध्ये साठवला. हे सर्व अमेरिकेच्या स्वातंत्र्यावर ते करू शकले, हे सर्वांना माहिती आहे. हे सर्व करत असताना अमेरिकन नागरिकांची मात्र गळचेपी होत आहे. आता माझ्या कार्यकाळात या सर्वांवर चाप लावला जाईल.”

एआयच्या शर्यतीत आपल्याला विजय मिळवायचा असेल तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये आणि सिलिकॉन व्हॅलीच्या पलीकडे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र निष्ठा जागृत करावी लागेल, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.