इराणमध्ये सोमवारी करोनामुळे आणखी १२७ बळी गेल्याने देशातील करोना बळींची संख्या १८१२ वर पोहचली आहे. इराणमध्ये करोनाचा २३०४९ लोकांना संसर्ग झाला आहे. मध्यपूर्वेत करोनाचा सर्वाधिक फटका इराणला बसला असून, सुरुवातीलाच विलगीकरणाचे कठोर उपाय न योजल्याबद्दल त्याच्यावर व्यापक टीका झाली आहे. यासोबतच, इराणसोबत २०१५ साली झालेल्या अणुकरारातून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला बाहेर काढल्यानंतर या देशाला अमेरिकेच्या कठोर र्निबधांनाही तोंड द्यावे लागत आहे.

अमेरिकेत करोनाचे ४०० बळी

अमेरिकेत करोना विषाणूचा प्रसार वेगात होत असून एकूण ३४,००० लोकांना संसर्ग झाला असून ४०० जण मरण पावले आहेत.  वल्डरेमीटर या संकेतस्थळाच्या मते करोना विषाणूचा संसर्ग ३३,५४६ लोकांना झाला असून रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांना करोनाचा ससंर्ग झाला असून मृतांची संख्या ४१९ आहे. पॉल हे करोनाचा संसर्ग झालेले पहिले सिनेटर असून ते विलगीकरणात गेले आहेत. दरम्यान व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन या ठिकाणी करोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये १५ हजार जणांना संसर्ग झाला आहे. त्यात २४ तासात ५४१८  लोकांची भर पडली असून न्यूयॉर्क मध्ये ११४ बळी गेले त्यात एका दिवसातील ५८ बळींचा समावेश आहे. न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासियो यांनी सांगितले की, जीवनावश्यक औषधांचा मोठा तुटवडा पुढील दहा दिवसात जाणवणार आहे.

इटलीत ५४७६ बळी

इटलीमध्ये रविवारी करोना संसर्गातील  मृतांची संख्या ५४७६ झाली असून या देशात एका दिवसात ६५१ बळी गेले आहेत. शनिवारी तेथे ७९३ बळी गेले होते. दरम्यान स्पेनमधील बळींची संख्या २२०३ झाली आहे. इटलीत गेल्या महिन्याभरात करोनाची साथ वाढत गेली असून तेथे चीनपेक्षा जास्त बळी गेले आहेत.

स्पेनमध्ये २४ तासांत ४६२ जण दगावले

स्पेनमध्ये २४ तासांत ४६२ लोक दगावल्यामुळे देशात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार १८२ झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले. एक दिवसापूर्वी जारी करण्यात आलेल्या मृत्युदराच्या आकडय़ांमध्ये २७ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.