Odisha : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बालासोर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने कॉलेजमधील एका शिक्षकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली. मात्र, तिच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेत ती विद्यार्थिनी जवळपास ९० टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या विद्यार्थिनीने एका वरिष्ठ प्राध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या आरोपानंतर कॉलेज प्रशासनाने निष्क्रियता दाखवली. संबंधित प्राध्यापकावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आता तिच्यावर एम्स भुवनेश्वर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. ती तिच्या जीवाशी झुंज देत आहे. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं की, तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. कारण ती जवळपास ९० टक्के भाजली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, तिच्यावर उपचारांसाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने संबंधित कॉलेजमधील प्राचार्य आणि आरोपी प्राध्यापकांना निलंबित केलं आहे. तसेच आरोपी प्राध्यापकाला पोलिसांनी अटकही केलं आहे. काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ती धरणे आंदोलन करत होती. तिच्या विभागप्रमुखाने तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप ती करत होती. तिने तक्रार समितीकडे तक्रारही केली होती. पण तरीही कोणतीही कारवाई झाली नाही.
महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे की, अंतर्गत तक्रार समितीने ९ जुलै रोजी अहवाल सादर केला होता. परंतु कथित लैंगिक छळाबाबत त्यामध्ये काहीही शिफारस करण्यात आलेली नाही. महिलेने १ जुलै रोजी पोलीस तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही. तसेच एका विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, त्या तरुणीला प्राध्यापकाने शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.
दरम्यान, महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये या तरुणीने शनिवारी पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतलं. त्यामुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ही घटना घडली तेव्हा आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही दुखापत झाली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला अटक केली आहे.
बालासोरचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. तसेच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री सूर्यवंशी सूरज यांनी म्हटलं की, महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.