भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासंदर्भात सर्वच पक्षांची सरकारं त्यांच्या कार्यकाळात वेळोवेळी दावे करत आली आहेत. मात्र, अजूनही भ्रष्टाचाराला आळा घालण्यात कोणत्याही पक्षाच्या सरकारला पुरेसं यश आलेलं नाही. त्याचाच प्रत्यय नुकताच ओडिशामध्ये आला असून एका सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. यावेळी एखाद्या चित्रपटात शोभतील अशा नाट्यमय घडामोडींनंतर या अधिकाऱ्याच्या तीन घरांमधून अधिकाऱ्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती जप्त केली आहे.

कुठे झाली कारवाई?

ओडिशा प्रशासकीय सेवेतला वरीष्ठ अधिकारी प्रसांताकुमार रौतच्या नबरंगपूर जिल्ह्यातील घरी ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास पथकानं छापा टाकला. रौत सध्या नबरंगपूर जिल्ह्यात अतिरिक्त उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहे. जिल्ह्यातील त्याच्या कानन विहारमधील घरी पोलिसांनी छापा टाकला. त्याचबरोबर त्याच्या भुबनेश्वरमधील घरी आणि इतर संबंधित ठिकाणीही पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३ कोटींची रोकड जप्त केली. याचबरोबर सोन्याचे दागिने आणि इतर मालमत्ताही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

चित्रपटात शोभेल अशी धाड!

शुक्रवारी ओडिशा पोलिसांच्या पथकानं ही छापेमारी केली. जेव्हा पोलीस रौतच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजाच उघडला नाही. त्याच्या भुबनेश्वरमधील घराला पोलिसांनी घेराव घातला. काही वेळाने त्याच्या टेरेसमधून शेजाऱ्यांच्या टेरेसवर काही खोके फेकण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी तातडीने शेजाऱ्यांच्या घराच्या टेरेसवर धाव घेतली. फेकलेले खोके तपासले असता त्यातून ५०० रुपयांच्या नोटांची बंडलं सापडली. या ६ खोक्यांमधून पोलिसांना २ कोटी ३ लाखांची रोकड हाती लागली.

यानंतर मात्र रौतच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. एकीकडे भुबनेश्वरच्या घरी छापा टाकला जात असताना दुसरीकडे नबरंगपूरमधील त्याच्या घरीही दुसऱ्या एका पथकानं छापा टाकला.

काय सापडलं छाप्यामध्ये?

पोलिसांना छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. एका पुस्तकांच्या कपाटाच्या मागे भिंतीमध्ये १० लाख ३७ हजारांची रोकड लपवून ठेवली होती. तसेच, नबरंगपूरच्या घरातून पोलिसांनी ८९ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. शेजाऱ्यांच्या घरातूनही नोटांची बंडलं ठेवलेले सहा खोके पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात २ कोटी ३ लाखांची रोकड हाती लागली. त्यामुळे एकूण ३ कोटींची रक्कम पोलिसांनी या छाप्यात ताब्यात घेतली. त्याशिवाय, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्तीही पोलिसांनी ताब्यात घेतली.

सरकारी अधिकाऱ्यावरचा राज्यातला दुसरा मोठा छापा

दरम्यान, हा ओडिशामध्ये आत्तापर्यंत सरकारी अधिकाऱ्यावर टाकण्यात आलेला दुसरा मोठा छापा मानला जात आहे. याआधी गेल्याच वर्षी १० एप्रिल २०२२ रोजी आर्थिक गुन्हे तपास पथकानं गंजम भागातील माजी सहाय्यक अभियंता कार्तिकेश्वर रौलच्या घरून तब्बल ३ कोटी ४१ लाखांची रोकड जप्त केली होती.