उत्तरकाशी : सिल्क्यारा बोगद्यात गेल्या सात दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्यावरील टेकडीला उभा छेद देऊन ‘प्रवेश मार्ग’ तयार करण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले. हिमालयाच्या पर्वतराजीतील माती एकसमान नसल्यामुळे खोदकाम, पर्यायाने बचावकार्य आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अडकलेल्या कामगारांना पुरेसे अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी रविवारी सकाळी ढिगाऱ्यातून ४२ मीटपर्यंत मोठय़ा व्यासाच्या नलिका टाकण्यात आल्या आहेत, असे तेथील नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दुर्घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही त्यांच्या बरोबर होते. ‘‘बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. पंरतु कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबल टिकवून ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे,’’ असे गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

हेही वाचा >>> अर्थव्यवस्था ४००० अब्ज डॉलरची? अधिकृत दुजोरा नाही;  दोन केंद्रीय मंत्री, फडणवीस यांच्यासह अदानींकडून प्रशंसा

हिमालयातील मातीचा स्तर एकसमान नाही. काही ती ठिकाणी मऊ आहे, तर काही ठिकाणी कठीण असते. त्यामुळे यंत्रांच्या साह्याने चालू असलेले बचावकार्य आव्हानात्मक आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. खोदकाम करणारी दोन ऑगर यंत्रे व्यवस्थित चालली तर अडकलेल्या कामगारांची सुमारे दोन ते अडीच दिवसांत सुटका होऊ शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत अमेरिकी ‘ऑगर’ यंत्राद्वारे जमिनीला समांतर खोदकाम ही जलत पद्धत आहे. हे यंत्र मऊ मातीत सुरळीतपणे खोदकाम करीत होते. परंतु त्याच्या खोदकामात काही कठीण अडथळे  आल्यामुळे ते फोडण्यासाठी त्याला अधिक बळ लावावे लागले आणि ते मोठय़ा प्रमाणावर थरथरू लागले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे काम थांबवावे लागले, असेही गडकरी म्हणाले.

गडकरी म्हणाले की अडकलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबल टिकवून ठेवणे ही या क्षणी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अडकलेल्या कामगारांना सतत ऑक्सिजन, वीज, अन्न, पाणी आणि औषधे पुरवली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कामगारांना भात, भाकर, भाजी यांचा पुरवठा करण्यासाठी ढिगाऱ्यातून मोठय़ा व्यासाची पर्यायी नलिका टाकण्यात आली आहे. तसेच विविध जीवनसत्वे, नैराश्यावरील औषधे (अँटिडिप्रेसेंट्स) आणि सुका मेवाही पुरवला जात आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी दिली.

एकाचवेळी सहा पर्यायांचा विचार : गडकरी 

एकाचवेळी सहा पर्याय अवलंबण्यात येत आहेत. पंतप्रधान कार्यालयही बचावकार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व केले जाईल. कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांचे मनोबल टिकवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

नव्या पद्धतीचा अवलंब

अडकलेल्या कामगारांची सुरक्षितता आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो, याबाबतच्या सूचना करण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना एकत्र बोलावण्यात आले आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officials consider alternate rescue plans to rescue 41 workers trapped in tunnel collapsed zws