Ola CEO Bhavish Aggarwal Booked: ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमधील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावर झालेल्या छळाची माहिती देणारी २८ पानांची सुसाइड नोट आढळल्यानंतर सदर गुन्हा दाखल झाला आहे. बंगळुरू पोलिसांनी ओलाचे अधिकारी सुब्रत कुमार दास यांच्यासह इतरांची नावेही यात समाविष्ट केली आहेत.

आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव के. अरविंद (वय ३८) असे असून तो बंगळुरूमधील चिक्कलसांद्रा येथे राहत होता. २०२२ पासून तो ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलोगेशन इंजिनिअर म्हणून काम करत होता. २८ सप्टेंबर रोजी अरविंदने राहत्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. अरविंदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना एक सविस्तर सुसाइड नोट सापडली. ज्यामध्ये अरविंदने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कामाच्या ठिकाणी सतत छळ आणि दबाव आणल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी अरविंदचा मोठा भाऊ अश्विन कन्नन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी भाविश अग्रवाल यांच्यासह इतरांच्या नावाचाही समावेश केला आहे.

बँक खात्यात १७ लाख आल्यानंतर संशय बळावला

एफआयआरमधील माहितीनुसार, अरविंदच्या मृत्यूच्या दोन दिवसांनी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी त्याच्या बँक खात्यात एनइएफटीद्वारे १७ लाख ४६ हजार ३१३ रुपये जमा झाले. एवढ्या पैशांचा मेसेज आल्यानंतर अरविंदचा भाऊ अश्विनला संशय आला. अश्विनने म्हटले, “आम्ही याची सुब्रत कुमार दास यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी एचआरशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर ओला इलेक्ट्रिकचे प्रतिनिधी कृतेश देसाई, परमेश आणि रोशन घरी आले. त्यांनी पैशांच्या व्यवहाराची माहिती दिली. पण यातून कंपनी काहीतरी लपवत असल्याचा आम्हाला संशय आला.”

अरविंदने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते की, कामाच्या ठिकाणी सुब्रत कुमार दास आणि अग्रवाल त्याचा छळ करत होते. त्याला वेतन आणि इतर प्रोत्साहन भत्ते दिले जात नव्हते. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. दरम्यान अश्विशनने या दाव्यानंतर न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ओलाकडून अद्याप प्रतिक्रिया नाही

भाविश अग्रवाल आणि दास यांच्यापैकी कुणीही अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस उपायुक्त (दक्षिण पश्चिम) अनिता हड्डनावर यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदण्यात आले होते. कथित सुसाईड नोट पुढे आल्यानंतर भावाने तक्रार दाखल केली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.