पीटीआय, नवी दिल्ली
“देशामध्ये एक जीबी वायरलेस डेटा एक कप चहापेक्षा स्वस्त आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयसीएम) उद्घाटन करताना मोदी यांनी देशातील डिजिटल वाढ आणि ‘मेक इन इंडिया’ यावर भर दिला. मोबाइल ते सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या सर्व वस्तूंचे उत्पादन भारतातच करण्याचे त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केले.

‘आयसीएम’चे उद्घाटन करताना मोदी म्हणाले की, देशाची देशांतर्गत रचना, सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यवसाय करण्यातील सोपेपणा यामुळे भारत हा गुंतवणूकस्नेही देश असल्याची प्रतिमा आपण साध्य केली आहे. “या क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार बाजारपेठ, दुसऱ्या क्रमांकाची ५जी बाजारपेठ, मनुष्यबळ, गतिशीलता आणि मानसिकता आहे,” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तसेच अलिकडेच आसाममध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या ४जी स्टॅकचाही त्यांनी उल्लेख केला.

डिजिटल जोडणी ही आता केवळ एक विशेष बाब किंवा चैन राहिलेली नाही, ती भारतीयांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहे. १ जीबी वायरलेस डेटा हा एक कप चहापेक्षा स्वस्त आहे. जो देश एकेकाळी २जी मिळवण्यासाठी संघर्ष करत होता, त्या देशात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात ५जी आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान