पीटीआय, नवी दिल्ली
देशाच्या माजी सरन्यायाधीशांनी एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावित विधेयकावर संसदीय समितीसमोर आपले विचार मांडले.
‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेच्या घटनात्मकतेचे समर्थन करतानाच त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या व्यापक अधिकारांवर चिंता व्यक्त करीत सूचनाही सादर केल्या आहेत.
माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी संसदेच्या संयुक्त समितीला सादर केलेल्या त्यांच्या मतानुसार, लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन करते, हे विरोधकांचे मत फेटाळले आहे. संविधानाने कधीही राष्ट्रीय आणि राज्याच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेण्याचे आदेश दिलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रस्तावित संविधान दुरुस्ती विधेयकात निवडणूक आयोगाला दिलेल्या ‘व्यापक अधिकारां’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांमध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचाही समावेश झाला आहे.
यापूर्वी दोन माजी सरन्यायाधीश यू.यू. लळित आणि रंजन गोगोई फेब्रुवारी आणि मार्चमध्ये समितीसमोर हजर झाले होते.
रंजन गोगोई यांचाही विरोध
संविधान दुरुस्ती कायद्यात निवडणूक आयोगाला दिलेल्या ‘विवेकबुद्धीच्या वापरासाठी कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे न देता’ दिलेल्या ‘व्यापक अधिकारांवर’ माजी न्यायमूर्ती गोगोई यांनी चिंता व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाला दिलेल्या अमर्याद अधिकारांवर गोगोई यांनीदेखील सदस्यांच्या चिंतेशी सहमती दर्शविली.
११ जुलै रोजी संसदीय समितीची बैठक
चंद्रचूड आणि आणखी एक माजी सरन्यायाधीश जे.एस. केहर हे ११ जुलै रोजी भाजप खासदार पी.पी. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील समितीसमोर हजर राहणार आहेत. या बैठकीत समिती सदस्य माजी सरन्यायाधीशांशी संवाद साधणार असून त्यांची मतेही जाणून घेणार आहेत.
अमर्यादित अधिकारांमुळे निवडणूक आयोगाला लोकसभेसोबत एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य नाही. याद्वारे संविधानाने दिलेल्या पाच वर्षांच्या पलीकडे राज्य विधानसभेचा कार्यकाळ कमी करणे किंवा वाढवणे शक्य होऊ शकते. संविधानाने निवडणूक आयोगाला या अधिकाराचा वापर कोणत्या परिस्थितीत करता येईल याची व्याख्या, सीमांकन आणि रचना करणे आवश्यक आहे. – डी. वाय. चंद्रचूड, माजी सरन्यायाधीश
मते-मतांतरे
– निवडणुका टप्प्याटप्प्याने घ्याव्या, एकाचवेळी नाही. एकाचवेळी निवडणुका घेतल्यास विधानसभांचा उर्वरित कार्यकाळ कमी करण्याच्या निर्णयास कायदेशीररीत्या आव्हान दिले जाऊ शकते, असे त्यांचे मत होते.
– तथापि, तीन माजी सरन्यायाधीशांनी एकाच वेळी निवडणुकांच्या संकल्पनेच्या घटनात्मकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.
– एकाच वेळी निवडणुका घेतल्यास मतदारांचा त्यांचे प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकाराचा भंग होणार नसल्याचे तसेच प्रस्तावित विधेयक मतदारांना त्यांच्याद्वारे निवडून आलेल्या खासदार किंवा आमदारांद्वारे प्रतिनिधित्व करत राहण्याची खात्री देते, असे मत न्या. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
खर्च मर्यादेवर प्रश्नचिन्ह
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ आणि निवडणूक आचार नियम, १९६१ मध्ये उमेदवार निवडणूक प्रचारादरम्यान किती खर्च करू शकतो याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे, परंतु राजकीय पक्षांनी स्वत: केलेल्या खर्चावर कोणतीही मर्यादा नाही. त्यांनी सांगितले की नियमनातील ही तफावत निवडणूक प्रक्रियेत अधिक आर्थिक संसाधने असलेल्या पक्षांना अनुकूल आहे.