Operation Sindoor in NCERT Syllabus : एनसीईआरटीने (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) त्यांच्या अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश केला आहे. ऑपरेशन सिंदूरचं लष्करी व तांत्रिक यश आणि त्यातून दिलेला राजकीय संदेश या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत. एनसीईआरटीने दोन अभ्यासक्रम जारी केले आहेत. त्याअंतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेबाबतची माहिती दिली जाणार आहे.

या अभ्यासक्रमाद्वारे केवळ हल्ला, युद्ध आणि प्रत्युत्तर एवढंच शिकवलं जाणार नसून भारताची राजकीय भूमिका, शांतता व सुरक्षेसाठी भारताने उचललेलं पाऊल, शांततेसाठी भारताचा अग्रह याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना काय शिकवलं जाणार?

या अभ्यासक्रमात म्हटलं आहे की पाकिस्तानने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात त्यांचा सहभाग नसल्याचा दावा केला असला तरी हा हल्ला थेट त्यांच्या लष्करातील अधिकारी व राजकीय नेतृत्वाच्या आदेशानेच झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु, ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती. शांततेसाठी व स्वसंरक्षणासाठी उचललेलं पाऊल होतं. ही मोहीम भारतासाठी सन्मान व दृढनिश्चयाचं प्रतीक आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट असल्याचा उल्लेख

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले होते. या हल्ल्याचा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात उल्लेख करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात म्हटलं आहे की पाकिस्तान आणि त्यांच्या नेतृत्वाने, लष्करी अधिकाऱ्यांनी हा कट शिजवला आणि पूर्ण केला होता. मात्र, पाकिस्तानने सातत्याने भारताचे आरोप फेटाळले आहेत.

या लष्करी मोहिमेला सिंदूर असं नाव देण्यामागे शहिदांच्या पत्नींचा सन्मान करणं हे उद्दीष्ट होतं. शहिदांच्या पत्नींनी देशासाठी केलेल्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात म्हटलं आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हटलंय?

  • ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तिथे असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
  • भारतीय हवाई दलाने एकूण नऊ तळ निश्चित केले आणि क्षेपणास्त्र हल्ला करून सर्व तळ उद्ध्वस्त केले.
  • ही मोहीम फत्ते करायला भारतीय वायूदलाला केवळ २२ मिनिटे लागली.
  • या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारताने केला आहे.
  • तसेच या हल्ल्यावेळी कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला इजा झाली नाही.