Operation Sindoor : २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे २६ नागरिक ठार झाले. या हल्ल्यात निरपराध पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं. त्यानंतर शस्त्रविराम झाला. भारत आता पाकव्याप्त कब्जा करणार की काय? हे वाटत असतानाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्र विराम झाला. यानंतर लोकसभेत विरोधकांनी चर्चेची मागणी केली. ज्यावर चर्चा सुरु झाली आहे. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानशी शस्त्रविराम का केला ते सांगितलं.
राजनाथ सिंह नेमकं काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या देशातल्या सगळ्या दलातील सैनिकांच्या साहसाचं मी कौतुक करतो आणि त्यांना नमन करतो. ६ आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर या कारवाई केली. ही फक्त कारवाई नव्हती तर दहशतवादाविरोधात आपण उचललेलं हे कठोर पाऊल होतं. २२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. धर्म विचारुन २६ लोकांना ठार करण्यात आलं. माणुसकीला काळीमा फासणारंच हे उदाहरण ठरलं. या हल्ल्यानंतर पंतपध्रान नरेंद्र मोदींनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसह बैठक केली. ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या आधी सैन्य दलांच्या प्रमुखांनी भरपूर बारकावे तपासले. दहशतवाद्यांचा बिमोड आणि सामान्य नागरिकांचं नुकसान न करणारा पर्याय आपण या कारवाईसाठी निवडला असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं.
ऑपरेशन सिंदूर का राबवलं?
ऑपरेशन सिंदूर राबवण्याचं कारणच हे होतं की पाकिस्तानने ज्यांना पोसलं आहे त्या दहशतवाद्यांना उत्तर देणं आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करणं. तसंच पहलगाम मध्ये निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली त्याचं हे उत्तर होतं. दहशतवादी पाठवून प्रॉक्सी वॉर करणाऱ्या पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनचा उद्देश युद्ध करणं हा नव्हता. १० मे च्या सकाळी भारतीय वायुसेने पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने हार मानली आणि ते गुडघ्यावर आले. त्यांनी आपल्या डीजीएमओंशी संपर्क केला आणि हे सगळे हल्ले थांबवा अशी विनंती केली.
पाकिस्तान विरोधातली कारवाई का थांबवली?
१० मे च्या सकाळी पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केला तेव्हा पाकिस्तान गुडघ्यांवर आला. आता तरी हे हल्ले थांबवा अशी याचना आपल्या देशाकडे केली. त्यावेळी आम्ही पाकिस्तानला बजावलं की आम्ही ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं आहे. पाकिस्तानने यापुढे चुकूनही कुठलीही आगळीक केली तर त्यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गतच उत्तर दिलं जाईल असं आपण त्यांना ठणकावून सांगितलं. भारतीय वायुसेनेचे हल्ले, नियंत्रण रेषेवरची लष्कराची कारवाई आणि नौदलाची अचूक कारवाई यामुळे पाकिस्तानला पराभव मान्य करावा लागला. पाकिस्तानचा पराभव साधासुधा नव्हता. पाकिस्तानचं सैन्यबलही हरलं आणि त्यांचं मनोबलही ते हरवून बसले. पाकिस्तानच्या डीजीएमओंनी आपल्या डीजीएमओंनी कारवाई थांबवा, हल्ले थांबवा अशी याचना केली. आपण कुणाच्याही दबावाखाली येऊन शस्त्रविराम केला नाही असंही राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं. एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूरला स्थगिती देण्यात आली आहे. पाकिस्तानने कुठलीही कुरापत काढली किंवा आगळीक केली तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गतच उत्तर दिलं जाईल असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.