Donald Trump On Gaza Israel Hamas Ceasefire : गेल्या जवळपास दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली. गाझा येथे युद्धविराम व्हावा, यासाठी शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल आणि हमासने मंजुरी देखील दिली. त्यानंतर हमासच्या ताब्यात असलेले इस्रायलचे उर्वरित ओलीस आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांचं आदानप्रदान देखील करण्यात आलं.

गाझा युद्धविरामाच्या या शांतता करारामुळे दोन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबणार असल्यामुळे इस्रायल आणि हमासमधील या घडामोडीचं जगभरातून स्वागत केलं जात आहे. अर्जेंटिना, मलेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारतासह अनेक देशांनी शांततेचा संदेश देत युद्धविरामाचं स्वागत केलं. मात्र, एकीकडे शांतता करारावर सहमती दर्शवल्यानंतरही काही ठिकाणी रविवारी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गाझा युद्धबंदी करार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

या घडामोडींवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप गाझामधील युद्धबंदी कायम असल्याचं म्हटलं आहे. मात्र, हे सांगताना ट्रम्प यांनी हमासला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. “त्यांना आता चांगलं राहावं लागेल, जर ते चांगले राहत नसतील तर त्यांचा नायनाट केला जाईल”, अशा शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना हमासला इशारा दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

‘सतत हल्ले केल्यास कठोर…’: ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं की, “हिंसाचार कमी होईल या आशेने अमेरिका युद्धबंदीला आणखी थोडीशी संधी देईल. मात्र, सतत हल्ले केल्यास कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. जर ते असंच करत राहिले तर आम्ही तेथे जाऊ, मग ते खूप हिंसकपणे घडेल”, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, ट्रम्प पुढे असंही म्हणाले की, ते अमेरिकन सैन्य पाठवण्याबद्दल बोलत नव्हते तर शांतता योजनेवर स्वाक्षरी केलेल्या इतर देशांना पाठवण्याबद्दल बोलत होते.

हमास गाझा पट्टीत हल्ला करणार असल्याचा अमेरिकेचा दावा

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने नुकताच एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेकडे एक विश्वसनीय अहवाल आला असून त्या अहवालानुसार हमास गाझा पट्टीत नागरिकांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. मात्र, जर असं झालं तर हे पाऊल युद्धविरामाचं उल्लंघन करणारं ठरेल असं अमेरिकेने म्हटलं होतं.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एका निवेदनात म्हटलं की, “पॅलेस्टिनी नागरिकांवर हा नियोजित हल्ला युद्धबंदी कराराचं थेट आणि गंभीर उल्लंघन असेल. तसेच मध्यस्थींच्या प्रयत्नांद्वारे मिळवलेल्या महत्त्वपूर्ण शांतता कराराच्या प्रगतीला धक्का असेल. जर हमासने हा हल्ला केला तर गाझाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि युद्धबंदीची अखंडता जपण्यासाठी उपाययोजना केल्या जातील”, असा इशारा अमेरिकेने नुकताच दिला होता.