Reddit Post on Unemployement : गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलंय. शिक्षण आणि पात्रता असून कमी पगारात काम करावं लागत असल्याची ओरड तरुणांकडून होतेय. शिक्षणासाठी काढलेलं कर्ज फेडताना त्यांच्या नाकी नऊ येऊ लागल्या आहेत. परिणामी ही तरुण मंडळी आता नैराश्येच्या गर्तेत अडकले आहेत. अनेकजण त्यांचं दुःख सोशल मीडियावर व्यक्त करून यातून पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक अनुभव रेडिटवर एका वापरकर्त्याने शेअर केलाय. त्यात त्याने सांगितलंय की त्याच्यावर जवळपास ८५ लाखांचं कर्ज असून तो उदरनिर्वाहाकरता मॅकडोनाल्डमध्ये काम करत आहे.

रेडिटवरील वापरकर्त्याने फिलोसॉफी विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यासाठी त्याने जवळपास ८५ लाखांचं कर्ज काढलं. पण तरीही त्याला मनाजोगती आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही. अखेर त्याने मॅकडोनाल्डमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यामुळे त्याच्या कर्जाचे हप्ते तर लांबच राहिले, त्याचा नेहमीचा उदरनिर्वाह होणंही कठीण झालं आहे.

फिलॉसॉफी केली कारण…

रेडिटवर त्याने लिहिलंय की, “फिलॉसॉफीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर माझ्यावर जवळपास ८५ लाखांचं शैक्षणिक कर्ज झालं आहे. हा विषय मला अर्थपूर्ण वाटला, त्यामुळे मी या विषयात अभ्यास केला. तसंच, माझ्या प्राचार्यांनीही या विषयात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हे एक वेगळं आणि आदरपूर्वक क्षेत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे करिअरच्या विविध आणि व्यापक दिशा माझ्यासाठी खुल्या होतील असा आशावादही दाखवला.”

अधिक पात्र होण्याकरता मास्टर्सही केलं

“पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मला पुढची दिशा कळत नव्हती. मी जॉब मार्केटमध्ये परिपूर्ण आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळे मी मास्टर्स करण्याचा विचार केला. यामुळे मी नोकरी करण्यास अधिक पात्र होईन, असं मला वाटलं. मला वाटलं मी एक अत्यंत जबाबदारीपूर्ण काम करतोय”, असंही त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नोकरीसाठी अर्ज केले, पण…

“पण, मी आता मॅकडोनाल्डमध्ये अत्यंत कमी वेतनात काम करतो. जगण्यासाठी हा अत्यंत तुटपुंजा पगार आहे. गेल्यावर्षी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मी वर्षभर नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले. माझ्या क्षेत्राशी संबंधित अनेक कामासाठी अर्ज केले. मला कायदा विषयात रस नाही, मला रिसर्च, लेखन, नॉन प्रॉफिट काम, शिक्षण याविषयातही मी काम शोधलं”, असंही तो म्हणाला.

“अर्ज करूनही मला कुठूनच प्रतिसाद मिळाल नाही. जिथून प्रतिसाद मिळाला किंवा मला मुलाखतीसाठी बोलावलं तिथं मला माझ्या तांत्रिक कौशल्याबाबतच विचारलं गेलं. जे माझ्याकडे नाही. कोडिंग, डेटा अनालिसीस, सॉफ्टवेअर मी कधीच वापरले नाही. हे कौशल्य माझ्या नोकरीसाठी गरजेचे आहेत, असं मला आतापर्यंत कोणीही सांगितलेलं नाही”, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

Posts from the jobs
community on Reddit

“मी पुन्हा पीएचडी करायला जाणार नाही. थकलोय, खचलोय, पूर्णपणे जळून गेलोय. शिक्षणासाठी मी माझ्या आयुष्यातील खूप वर्षे आणि पैसे घालवले आहेत. हे पैसे मी पुन्हा कमावू शकेन असं वाटत नाही”, अशी आपबिती त्याने पोस्टमध्ये लिहिली आहे.

कौशल्य विकसित करावं लागेल

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने सल्ला दिला, “प्रशासकीय सहाय्यक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर कार्यकारी सहाय्यक म्हणून काम करा.” एका टिप्पणीत लिहिले होते, “हायस्कूल किंवा कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवण्याबद्दल काय?” एका रेडिट वापरकर्त्याने म्हटले, “दिवसाच्या शेवटी एक मूर्त कौशल्य असणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. यासाठी २-३ वर्षे लागू शकतात, परंतु तुम्हाला एक मूर्त कौशल्य विकसित करावे लागेल.”