Pahalgam terror attack पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा सगळ्या देशाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तसंच जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला जातो आहे. भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे काही निर्णय घेतले आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या कुरापती सुरु असल्या तरीही भारत लवकरच त्यांना जशास तसे उत्तर देईल यात शंका नाही. पहलगामच्या हल्ल्यानंतर मृत्यूच्या अनेक करुण कहाण्या समोर आल्या. दरम्यान एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने त्याच्या कुटुंबाचे आणि इतर ३५ ते ४० जणांचे प्राण कसे वाचवले ते पोस्ट करत सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

प्रसन्न कुमार भट नावाचा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर त्याच्या पत्नीसह काश्मीरला गेला होता. २२ एप्रिलच्या दरम्यानच ते दोघंही काश्मीर फिरायला गेले होते. पहलगाम या ठिकाणी असताना अचानक अज्ञात हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारामुळे काय करावं हे न कळल्याने लोक धावू लागले होते. गोंधळाची स्थितीही झाली होती. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ जणांना ठार केलं. दरम्यान प्रसन्न कुमार यांनी पोस्ट लिहून त्यांचा अनुभव सांगितला आहे.

काय आहे प्रसन्न कुमार भट यांची पोस्ट?

“काश्मीरमध्ये आम्ही होतो तेव्हाच तो क्षण समोर आला. जी घटना घडली ती अत्यंत भयंकर होती. या घटनेला राक्षसी कृत्य असंच म्हणता येईल. कारण ज्या निसर्गाचा आम्ही आनंद घेत होतो तो आमच्यासारख्या पर्यटकांच्या रक्ताने लाल झाला.” असं म्हणत प्रसन्न कुमार भट यांनी पोस्ट लिहिली आहे.

दैव बलवत्तर होतं म्हणून आम्ही वाचलो-भट

पोस्टमध्ये भट म्हणतात, दैव बलवत्तर होतं म्हणून माझ्या भावाच्या मदतीने आम्ही वाचलो. माझा भाऊ लष्करी अधिकारी आहे. त्याने माझे इतर पर्यटकांचे प्राण वाचवले. भट म्हणाले, आम्ही आठ दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर होतो. त्यापैकी दोन दिवस आम्ही आमचा पहलगाम दौरा पुढे ढकलला होता कारण वातावरण ढगाळ होतं. काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जातं. आम्ही तोच अनुभव आधीचे सगळे दिवस घेतला. ज्या दिवशी आम्ही पहलगामला जायचं ठरवलं तेव्हा मी, माझी पत्नी, माझा भाऊ आणि माझी मेहुणी आम्ही श्रीनगरहून पहलगामला कारने आलो. माझा भाऊ लष्करी अधिकारी आहे. त्याला सुट्टी मिळाल्याने आम्ही आमची सुट्टी त्याच्यासह काश्मीरमध्ये एंजॉय करायचं ठरवलं. २२ एप्रिलला दुपारी १२.३० ला आम्ही पहलगामला पोहचलो. त्यानंतर आण्ही बैसरन या ठिकाणाहून दुपारी १.३० च्या सुमारास खेचरांची स्वारी केली. तो रोड बऱ्यापैकी भुसभुशीत होता आणि आजूबाजूला पाईन वृक्ष होते. खेचरांसह आलेले जे गाईड होते त्यांनी हेच आमच्या काश्मीरचं खरं सौंदर्य आहे असं पहलगाम दाखवत सांगितलं. तिथे जवळच असलेल्या एका कॅफेमध्ये आम्ही चहा घेतला. दुपारचे २ वाजले होते. आम्ही थोडेफार फोटो काढले. ज्या ठिकाणी प्रवेश होता त्याच्या विरुद्ध दिशेला आम्ही होतो. २.२५ च्या दरम्यान आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला. दोन गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यानंतर काही वेळासाठी भायण शांतता पसरली. प्रत्येकजण काय घडलं असेल याची फक्त कल्पनाच करत होता. आम्ही पाहिलं होतं तिथे लहान मुलं खेळत होती, मोठी माणसं एंजॉय करत होती. काही क्षणातच मी आणि माझ्या भावाने दोन मृतदेह पाहिले. माझ्या भावाला तातडीने लक्षात आलं की हा दहशतवादी हल्ला आहे. असंही भट यांनी लिहिलं.

आम्हाला काही क्षणांत गोळ्या झाडण्याचे आवाज येऊ लागले

पुढे भट म्हणाले, त्यानंतर आम्हाला गोळ्या झाडल्याचे आणखी आवाज येऊ लागले आणि वातावरणात एकच कोलाहल माजला. किंकाळ्यांच्या आवाजांनी आसमंत भरुन गेला. गर्दीतले अनेक जण वाट फुटेल तिथे धावत होते. काही जण गेटच्या बाजूने आले. पण तिथेही दहशतवादी वाट बघत होते. त्यांनी ट्रिगर दाबून त्या लोकांनाही ठार केलं. माझ्या भावाला काय प्रकार घडला आहे तो समजला. त्याने तातडीने आम्हाला आणि आमच्यासह असलेल्या ३५ ते ४० प्रवाशआंना तिथून पुढे होण्यास सांगितलं. एके ठिकाणी उतार होता. तसंच पाणीही वाहात होतं. त्यामुळे आम्ही तिथे लपून बसल्यावर दहशतवाद्यांना दिसलो नाही. काही भाग शेवाळ असलेला आणि चिखल असलेला होता. पण आम्ही सगळे कसेबसे लपलो आणि हळूहळू वाट काढत तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागलो. ज्या ठिकाणी गोळीबार सुरु होता तिथून काही अंतरांवर झाडं होती आम्ही चौघेही लपलो. बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज मात्र वातावरण आणि मन दोन्ही सून्न करत होता.

आम्ही चिखलात जवळपास एक तास थांबलो आणि आमचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करु लागलो. आमच्यापैकी कुणीही जर धावलं असतं तर कदाचित अतिरेक्यांना आम्ही दिसू शकलो असतो आणि त्या बाजूनेही गोळीबार झाला असता. त्या भयंकर हल्ल्यातून आम्ही कसेबसे वाचलो. दुपारी ३.४० च्या दरम्यान हेलिकॉप्टरचा आवाज आला तेव्हा आम्हाला समजलं की सुरक्षा दल त्या ठिकाणी दाखल झालं आहे. ४ च्या सुमारास सुरक्षा दलांनी तो सगळा भाग सुरक्षित केला. पण ते गोळ्यांचे आवाज आणि त्यांचा प्रतिध्वनी दोन्ही आमच्या कानांत घुमत होतं. आमच्या आठवणींवर या घटनेने कायमचा ओरखडा दिला आहे. काश्मीरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी घडलेली ही घटना आणि ते रक्ताचे सडे आम्ही कधीही विसरु शकत नाही. असं भट यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pahalgam attack how mysuru man survived with his family and other 35 people said climbed under fence and hide in pit scj