Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले आहेत. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. याच या हल्ल्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. याच हल्ल्यात एक पत्नी आपल्या पतीच्या मृतदेहासमोर बसून मूक आक्रोश करते आहे असाही एक फोटो फोटो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर

काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर आला आहे. एक नवविवाहिता मधुचंद्रासाठी पहलगाम या ठिकाणी गेली होती. तिचा नवरा गोळीबारात ठार झाला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ ती स्तब्ध बसून आहे. तिचा हा मूक आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे. हा फोटो पाहून प्रत्येकाच्याच काळजात धस्स होतं आहे. अगदी याचप्रमाणे शुभम द्विवेदी यांचाही मृत्यू झाला आहे. शुभम यांचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं.

शुभमचे वडील सिमेंट व्यावसायिक

समोर आलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी शुभम द्विवेदी यांचं लग्न झालं होतं. शुभमचे वडील संजय द्विवेदी हे सिमेंट व्यावसायिक आहेत. शुभम आणि त्याची पत्नी बुधवारी म्हणजेच आज घरी परतणार होते. मात्र मंगळवारी शुभमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्याला ठार केलं. ज्यानंतर शुभमच्या पत्नीचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत.

शुभमच्या कुटुंबावर शोककळा

शुभम द्विवेदीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला समजली. ज्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमच्या मुलाला म्हणजेच शुभमला ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं तसंच इतर लोकांनाही ठार करण्यात आलं. सरकारने या हल्लेखोरांचा बदला घ्यायला हवा, तसंच शुभमचा मृतदेह लवकरात लवकर आमच्या घरी पाठवावा अशी मागणी शुभमच्या कुटुंबीयांनी केली आहे. आमच्या कुटुंबातले १० जण पहलगाममध्ये आहेत. बुधवारी काही लोक दिल्लीत येतील. आम्हाला शुभमचा मृतदेह लवकरात लवकर पाठवला जाईल अशी अपेक्षा आहे.

मंगळवारी नेमकं काय घडलं?

शुभम आणि त्याच्या पत्नीने दुपारी १ च्या सुमारास हॉटेल सोडलं. त्यानंतर ते घोडेस्वारीसाठी गेले होते. त्यांच्याबरोबरचे कुटुंबीय हॉटेलमध्ये थांबले होते. शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले असतानाच दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडून ठार केलं. इश्याना असं शुभमच्या पत्नीचं नाव आहे. शुभमला तिच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी ठार केलं. शुभमचा भाऊ मनोज याने ही माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. शुभमचा चुलत भाऊ सौरभ याने ही माहिती दिली की शुभम आणि इशान्या यांचं लग्न १३ फेब्रुवारीला झालं होतं. दोघंही काश्मीरमध्ये कुटुंबीयांसह फिरायला गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pahalgam terror attack just two months after marriage shubham dwivedi killed by terrorists in front of his wife scj