Pakistan Afghanistan Border clashes : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येते हवाई हल्ला झाल्याच्या घटनेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. यादरम्यान रविवारी तालिबानने पाकिस्तानला आयएसआयएस दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावर इशारा दिला आहे. याबरोबरच तालिबानने काबूलमध्ये झालेल्या एअरस्ट्राईकला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यात ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा आणि इतर ३० जण जखमी झाल्याचा दावा केला.
“पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर दडून बसलेल्या ISIS च्या महत्त्वाच्या सदस्यांना हद्दपार करावे किंवा त्यांना इस्लामिक अमिरातीकडे सोपवावे… ISIS ग्रुप अफगाणिस्तानसह जगातील अनेक देशांसाठी धोका आहे,” असे तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
अफगाणीस्तानला त्यांचे हवाई आणि जमिनीच्या सीमांचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे सांगत मुजाहिद म्हणाले की आम्ही ड्युरँड रेषेवरील म्हणजेच अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर रात्रीभर सुरू असलेली मोहिम कतार आणि सौदी अरेबियाच्या विनंतीनंतर थांबवली आहे. यावेळी त्यांनी संघर्षात २० तालिबानी सैनिक ठार झाल्याचेही स्पष्ट केले.
तालिबानकडून पुढे असाही दावा केला की, त्यांच्या प्रशासनाने सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हद्दीतून ISIS ला त्वरीत हटवल्यानंतर, पाकिस्तानने त्यांच्यासाठी खैबर पख्तुनख्वा भागात नवीन प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.
“भरती केलेल्यांना कराची आणि इस्लामाबाद विमानतळांवरून प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्रांमध्ये आणले जात होते,” असा दावा मुजाहिद यांनी यावेळी केला. पाकिस्तानने काबूल आणि पकतिका येथे केलेल्या एअरस्ट्राइकनंतर अफगाणिस्तानने सीमेवरील अनेक पाकिस्तानी प्रांतांमध्ये हल्ले केले आहेत. तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सकाळी या हल्ल्यांबाबत माहिती दिली होती, त्यांच्या सैन्याने प्रत्युत्तरादाखल आणि यशस्वी ऑपरेशन्स केल्याचे सांगण्यात आले होते.
“जर विरोधी बाजूने पुन्हा अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले, तर आमचे सशस्त्र दल देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत आणि जोरदार प्रत्युत्तर देतील,” असे अफगाण संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.