शेजारी असलेल्या पाकिस्तानात महागाई दिवसेंदिवस नवनवे विक्रम करत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानातील जनतेला महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तान सरकारने आता पेट्रोलियम पदार्थांचे दर प्रति लिटर १० ते १२ रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी नागरिकांना तब्बल १६० रुपये मोजावे लागत आहेत.
हायस्पीड डिझेलचे दरही वाढले
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १२.०३ रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय हायस्पीड डिझेलच्या दरात प्रतिलिटर ९.५३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
१६० रुपये लिटर पेट्रोल
पाकिस्तानमध्ये लाईट डिझेलच्या दरात प्रतिलिटर ९.४३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रॉकेलही प्रतिलिटर १०.०८ रुपयांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर १४७.८२ रुपयांवरून १५९.८६ रुपये प्रति लिटर झाला आहे.
रॉकेलचा दर १२५ वर
त्याचप्रमाणे हायस्पीड डिझेलचा दर १४४.६२ रुपयांवरून १५४.१५ रुपये प्रति लिटर झाला आहे. लाईट डिझेल तेलाचे दर प्रतिलिटर ११४.५४ रुपयांवरून १२३.९७ रुपये झाले आहेत. रॉकेलचा दर प्रतिलिटर ११६.४८ रुपयांवरून १२६.५६ रुपयांवर पोहोचला आहे.
१६ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून दर लागू
द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्यानंतर येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. पाकिस्तानमधील पेट्रोलियम उत्पादनांचे नवीनतम दर १६ फेब्रुवारी मध्यरात्री ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत लागू होतील.