Pakistan Tiktok Murder: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी एका व्यक्तीने आपल्या मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. तिने तिचे टिकटॉक अकाउंट डिलीट करण्यास नकार दिल्याने वडिलांनी पोटच्या लेकीची हत्या केली. ही घटना रावळपिंडी जिल्ह्यातील ढोक चौधरी तख्त परी परिसरात घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडितेच्या वडिलांनी तिला तिचे टिकटॉक प्रोफाइल डिलीट करण्यास वारंवार सांगितले होते. तिने याला नकार दिल्यानंतर वडिलांनी तिच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला कुटुंबाने ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांवरून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे दिसून आले.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे आणि सर्व संभाव्य बाजू तपासल्या जात आहेत.