पीटीआय, इस्लामाबाद
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने सामरिक परस्परहितासाठी संरक्षण करार केला असून, त्यानुसार कुठल्याही देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला झाल्याचे समजले जाणार आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि सामरिक धोरणांवर याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी बुधवारी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
शरीफ एका दिवसाच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. दोन्ही देशांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात कराराची माहिती देण्यात आली. या करारात म्हटले आहे, की कुठल्याही देशावर झालेले आक्रमण हे दोन्ही देशांवरील आक्रमण समजले जाईल. दोन्ही देशांनी आपापल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची कटिबद्धता या करारातून स्पष्ट होत असून, याद्वारे प्रादेशिक स्तरावर आणि जगामध्ये सुरक्षा, शांतता प्रस्थापित केली जाईल. तसेच, दोन्ही देश संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य करतील आणि कुठल्याही आक्रमणाविरोधात संयुक्त प्ररोधन (डेटरन्स) तयार करतील.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या या करारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, ‘या करारामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर आणि प्रादेशिक, जागतिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात येईल. भारताचे राष्ट्रीय हित जपण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे. सर्व क्षेत्रांत सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षेची हमी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.’