पाकिस्तान : पोलिओ लसीकरण पथकावर दहशतवादी हल्ला, तीन ठार

पाकिस्तानमध्ये यावर्षी पोलिओचे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत

Pakistan Polio Vaccination
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पाकिस्तानच्या अशांत उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात, अज्ञात दहशतवाद्यांनी पोलिओ लसीकरण करणाऱ्या पथकावर हल्ला केला, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वाच्या वायव्य प्रांतात १५ महिन्यांच्या अंतरानंतर पाकिस्तानमध्ये यावर्षी पोलिओचे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे सध्या घरोघरी जाऊन पोलीओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरण करणाऱ्या याच पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये या पथकातील एक सदस्य आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रमुखांना दिले. तर, पोलिओ टीमवर हल्ले करणारे हे आमच्या मुलांचे शत्रू आहेत, असे उत्तर वझिरीस्तानचे उपायुक्त शाहिद अली खान यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये मागील काही काळापासून पोलिओविरोधी लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्यात वायव्य पाकिस्तानमध्ये पोलिओविरोधी मोहिमेत सहभाग घेऊन घरी परतणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर, मागील वर्षी जानेवारीमध्ये, वायव्य पाकिस्तानात पोलिओ लसीकरण कर्मचार्‍यांच्या पथकाचे रक्षण करणार्‍या पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे जगातील एकमेव देश आहेत जिथे पोलिओचे उच्चाटन झालेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistan terrorist attack on polio vaccination team three killed msr

Next Story
“मोदी सरकारला फक्त काँग्रेसमुक्त भारत नकोय, तर विरोधी पक्षमुक्त भारत हवाय”, कपिल सिब्बल यांची टीका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी