Pakistan Tomatoes 600 PKR Per KG: पाकिस्तानमधील टोमॅटोच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. अनेक बाजारपेठांमध्ये टोमॅटो ५५० ते ६०० पाकिस्तानी रुपये प्रति किलोप्रमाणे विकले जात आहेत. हे सामान्य किमतींपेक्षा जवळजवळ ४००% जास्त आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्यात लष्करी संघर्ष झाला होता. यामुळे अफगाणिस्तानमधून टोमॅटोची आयात थांबल्याने आणि देशांतर्गत पिकांचे नुकसान झाल्यामुळे देशात टोमॅटोची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
११ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर लष्करी तणाव वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या लष्करी संघर्षामुळे तोरखम आणि चमनसारखे प्रमुख मार्ग बंद झाले. दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानला जबाबदार धरल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार थांबला आहे.
सीमा बंद असल्याने पाकिस्तानात होणारी सर्व प्रकारची आयात थांबली आहे. अफगाणिस्तानातून येणारे टोमॅटोचे ट्रक सीमेपलीकडे अडकले आहेत. सुमारे ५,००० कंटेनर अडवल्यामुळे कराची, लाहोर आणि इस्लामाबादमधील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
याचबरोबर, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि सिंधमध्ये पूर आणि खराब हवामानामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाले आहे. बलुचिस्तानमधील टोमॅटोचा साठा संपत आहे आणि इराणमधून होणारी आयातही मंदावली आहे, ज्यामुळे मागणी-पुरवठा तफावत वाढत आहे. कमकुवत नियमांचा फायदा घेत घाऊक विक्रेत्यांनी किमती वाढवल्या आहेत.
टोमॅटोच्या किमतीतील चढ-उतार पाकिस्तानसाठी नवीन नाहीत. २०११ मध्ये भारतातून टोमॅटोचा पुरवठा वाढला आणि पाकिस्तानमध्ये तो विक्रमी पातळीवर पोहोचला. त्यावेळी दिल्ली आणि नाशिकहून दररोज अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानला ट्रक पाठवले जात होते, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतही टोमॅटोच्या किमती वाढल्या होत्या. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सिंध आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये पूरसदृश परिस्थितीमुळे स्थानिक उत्पादनावर परिणाम होतो आणि किमती वाढतात. आताही हाच ट्रेंड दिसून येत आहे, कारण सीमा बंद झाल्यामुळे आयात थांबली आहे आणि स्थानिक पुरवठा कमी झाला आहे.
टोमॅटोच्या आधी, पाकिस्तानने जुलै २०२३ मध्ये जगातील सर्वात महागड्या पिठाचा विक्रमही केला होता. त्यावेळी कराचीमध्ये २० किलोच्या पिठाची पिशवी ३,२०० रुपयांना विकली जात होती. साखरेचे दरही प्रति किलो १६० रुपयांवर पोहोचले आहेत. आता, गगनाला भिडणाऱ्या टोमॅटोच्या किमती हे संकट आणखी वाढवत आहेत.
