Pakistani Doctor Surgery Left Midway In England: इंग्लंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका पाकिस्तानी डॉक्टरने रुग्णाची शस्त्रक्रिया अर्धवट सोडून, रुग्णालयातील दुसऱ्या खोलीत एका नर्सशी लैंगिक संबंध ठेवल्याचे वृत्त आहे. हा ४४ वर्षीय पाकिस्तानी डॉक्टर “कम्फर्ट ब्रेक” हवा आहे असे सांगून, रुग्णाला भूल देऊन ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडला. त्यानंतर तो रुग्णालयातील दुसऱ्या एका खोलीत, एका नर्सबरोबर आक्षेपार्ह स्थितीत आढळला. ही घटना इंग्लंडच्या ग्रेटर मँचेस्टरमधील आहे. याबाबत बीबीसीने वृत्त दिले आहे.
दरम्यान, ही घटना सप्टेंबर २०२३ मध्ये घडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानला परतला होता. पण त्याने पुन्हा इंग्लंडमध्ये काम करण्यासाठी अर्ज केल्यानंतर, मँचेस्टरमध्ये झालेल्या ‘फिटनेस-टू-प्रॅक्टिस’ सुनावणीदरम्यान हा प्रकार पुन्हा समोर आला आहे. डॉक्टरने हे सर्व आरोप मान्य केले आहेत आणि त्याचे कृत्य “लज्जास्पद” असल्याचे म्हटले आहे.
जनरल मेडिकल कौन्सिलने उघड केले की, या डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडताना दुसऱ्या एका नर्सला बेशुद्ध रुग्णावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितले होते. पण हा प्रकार म्हणजे विश्वासघातकी घटना आहे, ज्यामुळे ऑपरेशन थिएटरमधील व्यावसायिक वर्तनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जनरल मेडिकल कौन्सिलचे प्रतिनिधित्व करणारे वकील अँड्र्यू मोलॉय यांनी बीबीसीला सांगितले की, त्या घटनेदरम्यान हा पाकिस्तानी डॉक्टर सुमारे आठ मिनिटे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर होता. त्यानंतर तो परतला आणि शस्त्रक्रिया पूर्ण केली. या डॉक्टरने कबूल केले की, त्याच्या कृतीमुळे रुग्णाला धोका निर्माण होऊ शकला असता. याबाबत बोलताना डॉक्टरने म्हटले आहे की, “यासाठी मी स्वतःलाच दोषी मानतो.”
लाहोरमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठातून २००४ मध्ये पदवीधर झालेल्या सुहेल अंजुम या आरोपी डॉक्टरने त्याची वैद्यकीय कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी इंग्लंडमध्ये परतण्यासाठी अर्ज केला आहे. त्याने २०११ मध्ये इंग्लंडमध्ये वैद्यकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये तो पाकिस्तानला परतला होता. याबाबत ‘डेली मेल’ने वृत्त दिले आहे.