ईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात बोलताना नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने पाकिस्तानवर टीका केली आहे. पाकिस्तानी लोकच देशाचे आणि इस्लामचे नाव खराब करत असल्याची टीका तिने केली आहे. पाकिस्तानी लोकांच्या या अशा वागण्यामुळेच देशाचे आणि इस्लामची प्रतिमा डागाळली आहे असे तिने म्हटले.
इस्लामबद्दल इतर लोकांना अकारण भीती आहे असे आपण नेहमी म्हणतो. तसेच पाकिस्तानला इतर देशातील लोक नाव ठेवतात अशी तक्रारदेखील आपण करतो. परंतु, पाकिस्तानची प्रतिमा दुसरे कुणी खराब करत नसून आपल्याच देशातील काही लोक खराब करत असल्याचे तिने म्हटले. आपल्या देशाचे नाव खराब करण्यास आपणच समर्थ आहोत अशी बोचरी टीका मलालाने केली. एका व्हिडिओ मेसेजद्वारे तिने आपले विचार मांडले आहेत.
गुरुवारी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या २३ वर्षीय मशाल खान या विद्यार्थ्याला जमावाने मारहाण केली. त्याने ईश्वरनिंदा करणारी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्याला आधी खूप मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याला गोळी मारण्यात आली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती.
आपण पीडित मुलाच्या वडिलांशी बोललो असल्याचे मलालाने म्हटले. देशामध्ये शांतता आणि सहिष्णुता स्थापित व्हावी अशी प्रार्थना त्यांनी केली असल्याचे मलालाने म्हटले. ही गोष्ट केवळ मशालच्या मृत्यूची नाही तर यामुळे सर्व जगात एक वाईट संदेश गेला आहे. आपण इस्लामचा संदेश समजून घेतला नाही असे मलालाने म्हटले. इस्लामने शिकवलेली मूल्ये आणि चांगल्या वागणुकीची शिकवण आपण विसरलो आहोत असे मलालाने म्हटले.
पाकिस्तानच्या लोकांनी इस्लामचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असे तिने म्हटले. इस्लाम हा शांती आणि सहिष्णुतेचा धर्म आहे. प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षित रित्या जगण्याचा अधिकार असल्याचे तिने म्हटले. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर लोकांचा जीव जात असेल तर इथे कुणीच सुरक्षित राहणार नाही अशी खंत मलालाने व्यक्त केली.