Taliban Fighters Brought Pants Of Pkistani Soldiers Afert Attack: गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानचे तालिबान सैन्य आणि पाकिस्तानमध्ये जोरदार लष्करी संघर्ष सुरू आहे. बुधवारी काबूल आणि कंधारमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ अफगाण नागरिक ठार झाले तर १०० हून अधिक जण जखमी झाले. यानंतर तालिबानने प्रत्युत्तर म्हणून स्पिन-बोल्दकमधील पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ले केले आणि त्या ताब्यात घेतल्या. तालिबानच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाल्याचे वृत्त आहे. याचा पुरावा म्हणून तालिबानी सैनिक पाकिस्तानी सैनिकांच्या पँट घेऊन आले आहेत.
“ड्युरंड रेषेजवळील चौक्या सोडून पळालेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या पँट तालिबान सैन्याने आणून त्या अफगाणिस्तानातील पूर्व नांगराहार प्रांतात झळकावल्या”, असे बीबीसी अफगाणचे पत्रकार दाऊद जुनबिश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी तालिबानी सैनिकांचा पाकिस्तानी सैनिकांच्या पँट आणि शस्त्रे दाखवतानाचा एक फोटो शेअर केला आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानने काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या छावण्यांवर हवाई हल्ले केल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष पेटला आहे. सीमा संघर्ष आणि अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे.
अफगाणिस्तानच्या दाव्यानुसार, तालिबानी सैन्याच्या प्रतिहल्ल्यात २० पाकिस्तानी सुरक्षा चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या लष्कराने २०० हून अधिक तालिबानी सैनिकांना ठार मारल्याचे म्हटले आहे. या हिंसाचारामुळे चमन आणि तोरखम येथील सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
या लष्करी संघर्षामुळे अफगाणिस्तानातील लोक तालिबानला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊ लागले आहेत. अनेक नागरिक पाकिस्तानच्या आक्रमणाविरुद्ध देशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे म्हणत आहेत. “जर गरज पडली तर आम्ही मुजाहिदीन आणि अफगानिस्तानच्या सैन्यासह युद्धभूमीवर उतरू”, असे कंधार येथील मोहिबुल्लाह यांनी टोलो न्यूजला सांगितले.
पक्तिया येथील बैतुल्लाह नावाच्या आणखी एका नागरिकाने म्हटले की, “अफगाणिस्तानने त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले आगे. पाकिस्तानविरुद्ध सर्व लोक त्यांच्यासोबत उभे आहेत.”
काबूलचे नागरिक अब्दुल गफौर यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. “आम्ही अफगाणिस्तानचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहोत. कोणत्याही परदेशी व्यक्तीला आमच्या मातृभूमीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही”, असे ते म्हणाले.