देशातील अशांतता दूर करून युद्धबंदी करण्याबाबत पाकिस्तानी सरकारने  केलेल्या प्रस्तावाला पाकिस्तानी तालिबान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या २४ तासांत युद्धबंदीबाबतची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने उत्तर वझिरिस्तान भागातून आपले सैनिक मागे घ्यावेत, तसेच अटकेतील निरपराध नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी तालिबान्यांनी केल्याचे रविवारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेच्या प्रतिनिधींनी रविवारी येथील आदिवासी पट्टय़ात रविवारी चर्चा करून पाकिस्तानी सरकारच्या मागण्यांबाबत चर्चा केली. गेल्या दशकभरापासून सुरू असलेल्या देशातील हिंसाचारात ४० हजार हून अधिक लोकांचा बळी गेला असून, या पाश्र्वभूमीवर पाकिस्तान सरकारने टीटीपीशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पाकिस्तान सरकारशी शांतता बोलणी सुरू झाल्यानंतरही तालिबान्यांनी दहशतवादी हल्ले सुरूच ठेवले होते. त्यामुळे दहशतवादी हल्ले अशाच प्रकारे सुरू राहिले तर शांतता चर्चेवर त्याचा विपरीत परिणाम होईल, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
या पाश्र्वभूमीवर टीटीपीतर्फे पुढील २४ तासांत युद्धबंदी जाहीर होण्याची शक्यता स्थानिक वृत्तवाहिन्यांनी तालिबानी सूत्रांच्या हवाल्याने व्यक्त केली आहे. उत्तर वझिरिस्तान आदिवासी पट्टय़ातून पाकिस्तानने आपले सैनिक मागे घ्यावेत. तसेच सुरक्षा दलांनी अटक केलेल्या मुले, महिलांसह निशस्त्र नागरिकांना मुक्त करावे, अशी मागणीही पाकिस्तानी तालिबान्यांनी केली आहे. मात्र सुरक्षा दलांना उत्तर वझिरिस्तान भागातून माघारी घेण्याबाबतच्या टीटीपीच्या मागणीबाबत पाकिस्तानी लष्कराकडून विरोध होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
युद्धबंदीबाबत अनुकूलता दर्शवणाऱ्या टीटीपीच्या या शिष्टमंडळात संघटनेचा उपमुख्य पदाधिकारी कारी शकील अहमद हक्कानी, टीटीपी प्रवक्ता आझम तारिक, अमिर इस्लाम, कमांडर अहमद, अन्वर गंदापुरी, क्वेटा विभागप्रमुख पीर साहब, मौलाना अब्दुल्ला आणि कमांडर पश्तून यांचा समावेश आहे.