Nuclear Sites in Iran: गेल्या दोन आठवड्यांपासून चालू असलेलं इराण-इस्रायल युद्ध अखेर थांबलं असून युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात अमेरिकेनं युद्धात प्रवेश करत इराणमधील तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. इराण व इस्रायल यांच्यातील युद्धबंदी आपल्याच पुढाकाराने झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच, इराणमधील आण्विक तळ अमेरिकेने पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचंही ट्रम्प ठामपणे सांगत असताना त्यांचं सत्ताकेंद्र असलेल्या पेंटॅगॉनने दिलेल्या अहवालात हा दावा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे इराणमध्ये नेमकं काय घडलं? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी अर्थात DIA नं यासंदर्भातला एक अहवाल सादर केला आहे. यूएस सेंट्रल कमांडच्या निर्देशांनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे. इराणमधील तीन महत्त्वाच्या आण्विक तळांना अमेरिकन बॉम्बर्सनं लक्ष्य केल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला होता. एकीकडे ट्रम्प यांनी आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला असताना या अहवालात मात्र वेगळाच दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या DIA अहवालात काय म्हटलं आहे?
२० जून रोजी अमेरिकेच्या बी-टू विमानांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या मूलभूत बाबींना कोणताही धक्का बसलेला नसून या हल्ल्यात झालेल्या नुकसानामुळे हा कार्यक्रम काही महिने मागे ढकलला गेला आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अर्थात, या नुकसानातून पुन्हा उभं राहण्यासाठी इराणच्या अणुकार्यक्रमाला आता काही महिने तरी जाऊ शकतात, असा अंदाज या अहवालात नमूद करण्यात आला आहे.
अमेरिकन सरकारमध्येच मतभेद?
दरम्यान,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इतर उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यांच्या अगदी उलट दावे डीआयएच्या अहवालात करण्यात आल्यामुळे मोठा सभ्रम निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी काही आंतरराष्ट्रीय माध्यम समूहांना लक्ष्य करत इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त केल्याचा पुन्हा एकदा दावा केला. “हे माध्यम समूह इतिहासातील एक सर्वात यशस्वी लष्करी हल्ल्याचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणमधील आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या माध्यम समूहांवर अमेरिकन नागरिकांकडून टीका केली जात आहे”, असं ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांचा दावा काय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला त्यांच्या सरकारमधील उच्चपदस्थांनी दुजोरा दिला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लीविट यांना यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाच सुनावलं आहे. “जेव्हा ३० हजार पौंड वजनाचे तब्बल १३ बॉम्ब एखाद्या लक्ष्यावर पडतात, तेव्हा काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात करण्यात येणारे दावे धादांत खोटे आहेत”, अशी स्पष्ट भूमिका कॅरोलीन लीविट यांनी घेतली आहे.