संसेदत घुसखोरी केलेल्या तरुणांनची दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून चौकशी होत आहे. या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झाची चौकशी केली असताना या तरुणांना संसदेत येऊन काय करायचे होते? याचाही तपास पोलिसांनी केला आहे. यावेळी संसदेत आलेले चारही तरूण आणि ललित झा, हे आत्मदहन करण्याच्या विचारात होते. संसदेच्या आत आणि संसदेच्या बाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला जाणार होता. पण त्यांना वेळीच अग्निरोधक जेल मिळाले नाही, म्हणून त्यांनी हा विचार बाजूला ठेवला, अशी माहिती ललितच्या चौकशीतून समोर आल्याची बातमी टाइम्स नाऊ या वृत्त संकेतस्थळाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ललित झाने सांगितले की, धुराच्या नळकांड्या फोडण्याची योजना आयत्यावेळेला आखली गेली. त्यांच्यासाठी हा प्लॅन बी होता. सागर शर्मा, डी. मनोरंजन, नीलम आणि अमोल शिंदे यांनी स्वतःसह सात धुराच्या नळकांड्या आणल्या होत्या. संसदेच्या आवारात नीलम आणि अमोलने धुराच्या नळकांड्या फोडून घोषणाबाजी केल्यानंतर संसद आवारात उपस्थित असलेल्या ललित झाने तिथून पळ काढला आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मोबाईलची विल्हेवाट लावली, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

हे वाचा >> “… म्हणून तरुणांनी संसदेत घुसखोरी केली”, राहुल गांधी यांनी सांगितले कारण

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी संसदेत घुसखोरी करण्याचा प्रकार झाल्यानंतर ललित झा राजस्थानला पळून गेला होता. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर तो परत दिल्लीला आला आणि त्याने आत्मसमर्पण केले. ललित आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे परकीय देशांशी काही संबंध आहेत, याही अंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच ललितला पुन्हा राजस्थानमध्ये नेऊन तिथे गुन्हा कसा घडला, याचा फेरतपास केला जाणार असल्याचे पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा >> संसदेची सुरक्षा भेदून घोषणाबाजी करणारे कोणत्या विचारांनी प्रभावित; त्यांच्या समाजमाध्यम खात्यावर नेमके काय आहे? जाणून घ्या…

पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय निष्पन्न झालं

  • तरुणांनी प्लॅन बी (संसदेत जाऊन धुराच्या नळकांड्या फोडणे) अंमलात आणण्याआधी सरकारला एक ठळक संदेश देण्यासाठी इतर पर्यायांचाही विचार केला होतात, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पीटीआयला दिली.
  • त्यांनी स्वतःला जाळून घेण्याचाही विचार केला होता. मात्र अग्निरोधक जेल मिळाले नसल्यामुळे हा विचार मागे पडला.
  • तरुणांनी संसदेत जाऊन पत्रके भिरकावण्याचाही विचार केला होता, पण ऐनवेळी हा विचार मागे पडला.
  • दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भाजपाचे खासदार प्रताप सिंह यांचाही जबाब नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.
  • शुक्रवारी ( दि. १५ डिसेंबर) पोलिसांनी तरुणांना दिल्लीतील विविध स्थळी नेऊन त्याठिकाणी त्यांनी कसे नियोजन केले, याची उलट तपासणी केली.
  • पोलिसांनी संसदेचेही परवानगी मागितली आहे. प्रेक्षक गॅलरीतून सागर आणि मनोरंजन याने उडी कशी घेतली. याची तपासणी केली जाणार आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament breach accused wanted to immolate self what delhi police reveals know details kvg