सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी सर्वांना आश्चर्यात टाकणारी एक घटना घडली. लोकसभेत चर्चा सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक दालनातून थेट सभागृहात उडी घेतली. तसेच पिवळ्या धुराचा नळकांड्या फोडल्या. त्यानंतर या दोन तरुणांसह या कृत्यात सहभागी असलेल्या तरुणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत दहशतवादी कृत्य, दहशतवादी कृत्यासाठी कट रचल्याचा आरोप करीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर या कृत्यात सहभागी असलेले तरुण नेमक्या कोणत्या विचारांनी प्रेरित होते? त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यावर नेमके काय आहे? हे जाणून घेऊ.

सुरक्षा भेदणाऱ्यांना अटक; सध्या कोठडीत

संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदून घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये अनेकांचा समावेश होता. या कृत्यात ललित झा नावाच्या तरुणाने प्रमुख भूमिका निभावली होती. या आरोपीने नंतर दिल्ली पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी झा याला पोलिसांच्या विशेष पथकाकडे सुपूर्द केले आहे. या कृत्यात लखनौचा सागर शर्मा, म्हैसूरचा मनोरंजन डी, हिसारची नीलम देवी, कोलकात्याचा ललित झा व महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्व जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. विकी नावाच्या तरुणालाही हरियाणातील गुरुग्राम येथून ताब्यात घेण्यात आले आहे. संसदेत येण्यापूर्वी हे आरोपी याच विकीकडे थांबल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

आरोपी क्रांतिकारी विचारांनी प्रेरित

अटक करण्यात आलेल्या आरोपींची विचारधारा काय, असे विचारले जात आहे. दरम्यान, या तरुणांचे समाजमाध्यम खाते तपासल्यावर त्यांच्या विचारधारेबाबत काही तर्क लावता येतात. या सर्वच तरुणांना समाजावर परिणाम घडेल, असे काहीतरी करायचे होते. क्रांतिकारी विचारांनी ते प्रेरित असल्याचे दिसत आहे.

भगतसिंग फॅन क्लब

संसदेची सुरक्षा भेदून घोषणाबाजी करणारे सर्व तरुण हे फेसबुकवरील ‘भगतिसंग फॅन क्लब’ या पेजशी निगडित होते. साधारण दीड वर्षापूर्वी ते म्हैसूर येथे भेटले होते. अटक करण्यात आलेले बहुतांश सर्व आरोपी हे स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेले भगतसिंग, इतर हुतात्मे यांच्या विचारांनी प्रेरित होते.

नीलम देवी उच्चशिक्षित

अटक करण्यात आलेल्यांपैकी नीलम देवी ही तरुणी उच्चशिक्षित असून, तिने एम.ए., बी.एड्., एम.एड्.पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. तसेच नेट, एम.फिलची परीक्षादेखील ती उत्तीर्ण झालेली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित आहे. या मुलीने याआधी अनेक आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. त्यात शेतकरीविरोधी आंदोलन, बेरोजगारी, महागाई, कुस्तीपटूंनी केलेले आंदोलन अशा अनेक आंदोलनांचे समर्थन या तरुणीने केलेले आहे.

सागर शर्मा हा तरुण डाव्या विचारसरणीने प्रभावित

लखनौतील मानकनगरचा रहिवासी असलेला सागर शर्मा हा तरुण डाव्या विचारसरणीने प्रभावित असल्याचे दिसते. तशा काही पोस्ट या तरुणाने आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार अनेक महिन्यांपासून तो फेसबुकवर सक्रिय नाही. त्याच्या फेसबुक पेजवरून हे स्पष्ट झाले आहे की तो कोलकाता, राजस्थान, हरियाणा येथील काही लोकांच्या संपर्कात होता.

भगतसिंग यांच्या विचाराने प्रभावित

अमोल शिंदे या तरुणाने संसदेच्या परिसरात नीलम या तरुणीसोबत घोषणाबाजी केली होती. हा तरुणदेखील भगतसिंग यांच्या विचाराने प्रभावित झाल्याचे दिसते. समाजमाध्यमांवर त्याने काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही फोटोंत त्याने भगतसिंग यांचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. हा २५ वर्षीय तरुण अनेकदा मुंबईला जायचा. त्याला भारतीय सैन्यात दाखल व्हायचे होते.

भाजपाविरोधी भूमिका

अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी ललित मोहन झा नावाचा तरुण मूळचा बिहारचा आहे; मात्र सध्या तो कोलकाता येथे वास्तव्यास आहे. तो भाजपा सरकार, नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो देशांची युती, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अहिंसक धोरण यांचा टीकाकार आहे. त्याने स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, स्वामी विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती, समाजवादी कवी अदम गोंडवी यांचे विचार समाजमाध्यमावर शेअर केलेले आहेत.

ललित झा या तरुणाने साम्यवादी सुभाष सभा या संस्थेत काम केलेले आहे. या संस्थेमार्फत पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील आदिवासी तरुणांच्या शिक्षणावर काम केले जाते.

भगवान कृष्णापासून प्रेरणा

संसदेत जाऊन पिवळ्या रंगाच्या नळकांड्या फोडणाऱ्यांमध्ये सागर नावाचा तरुण समाजमाध्यमांवर स्वत:ला ‘सुप्त ज्वालामुखी’ असल्याचे सांगतो. इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने स्वत:ची कवी, लेख, तत्त्वज्ञ, अभिनेता, कलाकार अशी ओळख करून दिलेली आहे.

“विजय होईल किंवा पराजय”

हा तरुण अनेकदा भगवान कृष्णाने दिलेले उपदेश समाजमाध्यमांवर शेअर करायचा. संसदेत घुसण्याच्या दोन दिवसांआधी त्याने “विजय होईल किंवा पराजय होईल; पण प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता हा प्रवास किती सुंदर असेल हे पाहायचे आहे. आशा आहे की, पुन्हा भेट होईल,” असे आपल्या समाजमाध्यम खात्यावर म्हटले होते.

मनोरंजन डी. अभियंता

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मनोरंजन डी. नावाचा तरुण मूळचा म्हैसूर येथील रहिवासी आहे; मात्र तो समाजमाध्यमांवर कोठेही नाही. सागरसोबत त्याने लोकसभेच्या सभागृहात उडी घेतली होती. मनोरंजन डी. याच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो पुस्तकी किडा आहे. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. त्याच्याकडे गुरिल्ला वॉरफेअर, भायखळा ते बँकॉक, वॉटर वॉर्स, आर्ट ऑफ वॉर, ऑलिव्हर ट्विस्ट यांसारखी पुस्तके आहेत.

१३ डिसेंबर रोजी नेमके काय घडले?

बुधवारी म्हणजेच १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेचे अधिवेशन सुरू असताना काही तरुण सुरक्षा व्यवस्था भेदून संसदेत आले होते. त्यातील दोन तरुणांनी लोकसभेच्या प्रेक्षक दालनातून थेट सभागृहात उडी घेत पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या; तर उर्वरित दोघांनी सभागृहांच्या बाहेर उभे राहत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सर्वांत आधी मनोरंजन, सागर, नीलम व अमोल या चार आरोपींना अटक केले. पोलिसांनी त्यांच्यावर सध्या यूएपीए कायद्यांतर्गत दहशतवादाचे आरोप ठेवले आहेत. यूएपीए कायद्यातील कलम १६ व कलम १८ अंतर्गत त्यांच्यावर दहशतवादी कृत्य करणे, दहशतवादी कट रचणे, अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.