“करदात्यांचे १५ हजार कोटी मोदी सरकारने राजकीय हेरगिरीसाठीच्या पेगॅसस स्पायवेअरवर खर्च केले”

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले तेव्हा या सॉफ्टवेअरची खरेदी केल्याचा दावा करण्यात आलाय.

Modi Government Pegasus
केंद्र सरकारवर निशाणा साधताना केलं ट्विट (प्रातिनिधिक फोटो)

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने इस्राईलमधील एनएसओ (NSO) या खासगी कंपनीने विकसित केलेल्या पेगॅसस स्पायवेअरसंदर्भात (Pegasus Spyware) काही धक्कादायक खुलासे केल्याने देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि अगदी न्यायपालिकेतील लोकांवर पाळत ठेवण्यासाठी भारत सरकारकडून वापर केला जात असल्यासंदर्भातील दावा करताना सरकारने २०१७ साली हे सॉफ्टवेअर इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला तेव्हा विकत घेतल्याचं म्हटलंय. यावरुनच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या दाव्यासंदर्भातील आकडेमोडीबद्दल ट्विट करत केंद्रावर निशाणा साधलाय.

काय माहिती समोर आलीय?
भारत सरकारकडून अधिकृतपणे पेगॅससची खरेदीची कबुली देण्यात आलेली नाही. मात्र न्यूयार्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये भारतासह काही देशांनी पेगॅसस स्पायवेअरची खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. विशेष म्हणजे पेगॅसस खरेदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ मधील इस्राईल भेटीचाही संबंध असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले तेव्हा भारताने इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगॅसस स्पायवेअरचा देखील समावेश असल्याचं न्यूयार्क टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

अधिकृत दुजोरा नाही…
२०१७ च्या इस्राईल दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात २ बिलियनच्या शस्त्रस्त्र खरेदीचा करार झाला. यातच क्षेपणास्त्र यंत्रणेसोबत पेगॅससचा समावेश होता. यानंतर नेत्यान्याहू यांनी जून २०१९ मध्ये भारत दौरा केला. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्राईलच्या बाजूने मतदान केलं. आतापर्यंत भारत किंवा इस्राईलपैकी कोणीही पेगॅसस खरेदीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

नक्की वाचा >> Pegasus Spyware: संजय राऊतांनी मोदी सरकावर साधला निशाणा; म्हणाले, ” आणीबाणीपेक्षाही…”

आव्हाड काय म्हणाले?
याचसंदर्भात ट्विट करताना आव्हाड यांनी, “एक बिलियन डॉलर म्हणजे ७५०० कोटी. दोन बिलियन डॉलर म्हणजे १५ हजार कोटी. इतक्यासाठी सांगतोय की, देशातील करदात्यांचा एवढा पैसा मोदी सरकारने पेगॅसस हे राजकीय हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला आहे, असा न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट आहे,” असं ट्विट आव्हाड यांनी केलंय.

जगभरात कोणत्या देशांनी पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले?
इस्राईल संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीने हे पेगॅसस स्पायवेअर अमेरिकेसह भारत, मेक्सिको, पोलंड, हंगेरी आणि इतर अनेक देशांना विकण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pegasus spyware issue jitendra awhad slams modi government says modi government spend 15000 cr from taxpayers money scsg

Next Story
Pegasus Spyware: संजय राऊतांनी मोदी सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही…”
फोटो गॅलरी