Delta Plane Crash : ८० प्रवाशांना घेऊन जाणारे डेल्टा एअर लाईन्सचे विमान टोरंटो विमानतळावर सोमवारी अपघातग्रस्त झाले. या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एंडेव्हर एअरचे विमान ४८१९ हे ७६ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह दुपारी कॅनडाच्या सर्वात मोठ्या महानगरात उतरत होते. या विमानाने अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस येथून उड्डाण केले होते, असे एअरलाइनने सांगितले. पॅरामेडिक सर्व्हिसेसने एएफपीला सांगितले की १७ लोक जखमी झाले आहेत ज्यात तीन गंभीर आहेत. गंभीर प्रवाशांमध्ये एक लहान मुलगा असून ६० वर्षीय एक पुरुष आणि ४० वर्षीय महिला आहे. किरकोळ दुखापत झालेल्या जखमींना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरने परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पॅरामेडिक सर्व्हिसेसचे लॉरेन्स सँडन यांनी दिली.

अपघात झाल्यानंतर प्रवासी पडले बाहेर

विमान उलटल्याने हा अपघात झाला असला तरीही विमान उलटले कसे हे अद्याप कळू शकलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार लोक उलट्या विमानातून अडखळत बाहेर पडताना दिसत आहेत, त्यांना जोरदार वारा आणि बर्फवृष्टीपासून स्वतःचं संरक्षण करत बाहेर पडावं लागलं असल्याचंही यात स्पष्ट दिसतंय.

विमानावर पाण्याचा फवारा

विमानाच्या फ्यूजलेजमधून धूर येत असतानाही काही प्रवासी विमानात अडकून होते. विमान खाली उलटल्याने आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता विमानावर पाण्याचा फवारा मारण्यात आला. टोरंटो विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेबोरा फ्लिंट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या घटनेत इतर कोणत्याही विमानांचा समावेश नाही. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी या प्रसंगात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी काही मिनिटीतांच अपघातस्थळावरू प्रवाशांना बाहेर काढलं. या घटनेनंतर विमानतळाने सर्व उड्डाणे स्थगित केली होती. जवळपास दोन तासांनी सायंकाळी ५ वाजता विमानसेवा सुरळीत करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plane with 80 onboard flips upside down at toronto airport sgk