नोटाबंदीवरून विरोधकांच्या तीव्र विरोधाचा सामना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या निर्णयावर थेट जनतेची मते मागवली आहेत. तुम्ही एका खास अॅपद्वारे नोटाबंदीच्या निर्णयावर आपल्या सूचना थेट माझ्यापर्यंत पोहोचवू शकता, असे आवाहन मोदींनी ट्विटरवरून जनतेला केले आहे. एका सर्व्हेच्या माध्यमातून आपली मते मांडण्यास त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी उचललेले हे पाऊल संसदेत नोटाबंदीच्या मुद्द्यावर होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना उत्तर देण्याचा हा प्रयत्नही मानला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नोटाबंदीसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर तुमची मते जाणून घ्यायची आहेत. त्यासाठी ‘नरेंद्र मोदी अॅप’वरील सर्व्हेत सहभागी व्हा, असे त्यात म्हटले आहे. अॅपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सर्व्हेत एकूण दहा प्रश्न विचारण्यात आले आहेत.

अॅपवरील सर्व्हेत विचारण्यात आलेले प्रश्न:

> सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत तुम्ही कोणता विचार करत आहात?
> भारतात काळा पैसा आहे, असे तुम्हाला वाटते का?
> भ्रष्टाचार आणि काळा पैसाविरोधात लढले पाहिजे, असे तुम्हाला वाटते का?
> भ्रष्टाचाराविरोधात सरकारच्या प्रयत्नांबाबत तुम्हाला काय वाटते?
> नोटाबंदीच्या निर्णयाबाबत तुम्ही कोणता विचार करताय?
> नोटाबंदीने दहशतवाद थांबणार का, नोटाबंदीने भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद थांबेल का?
> नोटाबंदीमुळे उच्च शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल का?
> नोटाबंदीनंतर किती प्रमाणात गैरसोय झाली?
> या निर्णयाच्या समर्थनार्थ तुम्ही भ्रष्टाचारविरोधात लढत आहात का?
> आपण कोणती सूचना देऊ इच्छित आहात का?

मोदींनी केलेल्या या ट्विटला काही मिनिटांतच शेकडो ट्विटर यूजर्सने रिट्विट केले. काही वेळातच एनएम अॅपला लोकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. त्यामुळे अॅपचा वेग काही वेळ मंदावला होता.