India on US Tariffs: भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून चांगलेच ताणले गेले आहेत. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अप्रत्यक्षपणे टीका केली. जग जेव्हा आर्थिक स्वार्थामुळे तयार झालेल्या आव्हानांना सामोरे जात आहे अशा काळात भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे पंतप्रधान म्हणाले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे.
मोदी काय म्हणाले?
दिल्लीतील सेमिकॉन इंडिया २०२५ मध्ये या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी आकडेवारीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी समोर आली. पुन्हा एकदा भारताने प्रत्येक अंदाज आणि प्रत्येक अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. एककीडे जगभरातील आर्थव्यवस्था चिंतेत आहेत, आर्थिक स्वार्थातून निर्माण झालेली आव्हाने आहेत, अशा काळात देखील भारताने ७.८ टक्क्यांची वाढ मिळवून दाखवली आहे. ही ग्रोथ सर्व क्षेत्रात आहे. सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. भारत ज्या वेगाने वाढत आहे, यामुळे सर्वांमध्ये नव्या उर्जेचा संचार होत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त वाढ
अमेरिकेच्या आयात शुल्कात तीव्र वाढीच्या परिणामांची चिंता दूर सारत एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा मजबूत वाढीची नोंद केली. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादनांत (जीडीपी) ७.८ टक्के दराने वाढ नोंदविली गेली असून ती आधीच्या पाच तिमाहींतील हा उच्चांक ठरला आहे. रिझर्व्ह बँकेने ऑगस्टच्या सुरुवातीला अंदाजलेल्या ६.५ टक्क्यांपेक्षाही ही वाढ सरस आहे.
सेमिकॉन इंडिया २०२५ च्या उद्घाटन सोहळ्यात बोलतान पंतप्रधान मोदी म्हणाले की, जग भारतावर विश्वास ठेवते आणि भारताच्या मदतीने सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास तयार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांना या कार्यक्रमात पहिल्या मेड-इन-इंडिया चिप्स देण्यात आल्या.
अमेरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतातून आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती आणि नंतर भारत रशियन तेल खरेदी करत असल्याचे सांगत अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली.