PM Modi speaks with French President Macron : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय मालावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी माझी मैत्री कायम राहिल, ते एक महान पंतप्रधान आहेत, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी दिली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्रम्प यांना उत्तर दिले आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संवादानंतर काही तासांतच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून दीर्घ चर्चा केल्याची बाब समोर आली आहे. यावेळी या नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी काम करण्याबद्दल विचारांची देवाणघेवाण झाली.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या फोन संभाषणाबद्दल माहिती दिली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे भारत आणि अमेरिकेत टॅरिफ आणि ट्रेडच्या मुद्द्यावर तणावाची परिस्थिती आहे, या पार्श्वभूमीवर दोन देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेला विशेष महत्त्व आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये माहिती दिली की, “राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याबरोबर खूप चांगली चर्चा झाली.आम्ही विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले. युक्रेनमधील संघर्ष लवकर संपवण्याच्या प्रयत्नांसह आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. जागतिक शांतता आणि स्थिरता वाढवण्यात भारत-फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावत राहील.”
या चर्चेला इतके महत्त्व का?
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यातील चर्चा य़ासाठी महत्त्वाची आहे कारण गेल्या एका महिन्याच्या कालावधित ही या दोन नेत्यांमध्ये झालेली दुसरी चर्चा आहे आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात झालेल्या चर्चेवेळी देखील फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांच्या बरोबर होते.
डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींचे उत्तर
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शुक्रवारी म्हणाले होते की, माझी आणि मोदींची मैत्री कायम राहिल. ते एक उत्तम पंतप्रधान आहेत. भारत आणि अमेरिकेचे विशेष नाते आहे. यात काळजी करण्यासारखे काही नाही. ते काही महिन्यांपूर्वी इथे आले होते. तेव्हा आम्ही एकत्र रोज गार्डनमध्ये गेलो होतो.भारताला तुम्ही गमवले आहे का? असा प्रश्न राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत-अमेरिका संबंधाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी जी सकारात्मकता दाखवली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आभार. आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत. जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि भविष्याकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन यामध्ये भारत आणि अमेरिका खूप सकारात्मक आहे.”