गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९०वा वाढदिवस शनिवारी साजरा केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लता मंगेशकरांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विमानातून लता मंगेशकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी रविवारी झालेल्या मन की बात कार्यक्रमात लता मंगेशकरांशी फोनवरून झालेला संवाद भारतीयांना ऐकवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच लता मंगेशकर यांचा उल्लेख केला. “देशातील महान व्यक्तिमत्व असलेल्या एका व्यक्तीविषयी बोलणार आहे. देशातील अनेक पर्वांची आणि घटनांची ती व्यक्ती साक्षीदार आहे. ती व्यक्ती म्हणजे लतादीदी,” असे मोदी म्हणाले. “परदेश दौऱ्यानिघण्यापूर्वी मला त्यांचीशी बोलण्याची संधी मिळाली होती. हा संवाद एक छोटा भाऊ मोठ्या बहिणीशी बोलत असल्यासारखाच होता. मी अशा व्यक्तिगत गोष्टी बोलत नाही. पण हा संवाद ऐकावा असं वाटतं, म्हणून ऐकवतोय,” असं मोदी म्हणाले.

मोदी आणि लता मंगेशकर यांच्यातील संवाद मन की बात मधून प्रसारित करण्यात आला. संवादाची सुरूवात मोदी यांनी केली. लतादीदी प्रणाम, म्हणत मोदी यांनी लता मंगेशकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “लतादीदी तुमच्या वाढदिवसालाच मी परदेश दौऱ्यावर जात असून विमानात आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला.” त्यावर लता मंगेशकरांनी आनंद व्यक्त केला. तसेच “कामाने जो मोठा असतो त्यांचे आशिर्वाद मिळणे चांगले असते. तुमच्या येण्यामुळे भारताचे चित्र बदलले आहे. तुम्ही काम करत आहात. त्यामुळं मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही,” असं लता मंगेशकर म्हणाल्या. मोदी म्हणाले,”मी परत येईपर्यंत तुमचा वाढदिवस होऊन गेलेला असेल. तुम्ही जेव्हा मला सांगता की, तुमची आई गुजराती आहे. तेव्हा मला खुप आनंद होतो. लतादीदी तुम्ही वयाने मोठ्या आहातच. पण, कामानेही खुप मोठ्या आहात. मी जेव्हा आपल्या भेटीला आलो. तेव्हा तेव्हा तुम्ही मला काही न काही गुजराती खाऊ घालता. आता पुन्हा मुंबईत आलो की, तुम्हाला भेटणार आणि तुम्ही बनवलेले गुजराती पदार्थ खाणार,” असं मोदी म्हणाले.