पीटीआय, रिओ दी जानेरो

जागतिक सहकार्य आणि बहुध्रुवीय जगाला पुढे नेण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांनी भूमिका बजावावी, असे आवाहन करतानाच जागतिक दक्षिण (ग्लोबल साउथ) भागांतील देशांसमोर आदर्श ठरेल, त्यांची अपेक्षा पूर्ण करील, असे नेतृत्व या संघटनेने करावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

बहुस्तरावरील आर्थिक व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता दृढ करण्याच्या विषयावर मोदी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘संघटनेची ताकद विविधतेमध्ये आणि बहुध्रुवीय जगासाठी कटिबद्धतेत दडली आहे. आपण येत्या काळात ‘ब्रिक्स’ संघटना बहुध्रुवीय जगाला दिशादर्शक ठरेल, असे काम कशा पद्धतीने करील, याकडे पाहायला हवे.’’

पंतप्रधान मोदी यांनी भारतामध्ये स्थापन झालेल्या ‘ब्रिक्स’च्या कृषी संशोधनाचा मुद्दा ठळकपणे मांडला. असे व्यासपीठ सहकार्याचा नवा आदर्श ठरू शकेल, असे ते म्हणाले. त्यांनी या वेळी ‘ब्रिक्स सायन्स अँड रिसर्च रिपॉझिटरी’च्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवला. विकसित देशांच्या सहाय्याने याची स्थापना करावी, असे ते म्हणाले.

जयशंकर यांची अन्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशिया, इराण आणि मेक्सिकोच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विस्तरावरील संबंध आणि जागतिक घडामोडींवर चर्चा केली. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह, इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची, मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री जुआन रामन दी ला फुआंत यांची त्यांनी भेट घेतली.

प्रथम ‘ब्रिक्स’ देशांनी आपली स्वत:ची अंतर्गत यंत्रणा सुधारायला हवी. त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढेल. ‘ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँके’च्या माध्यमातून कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी देताना मागणीचा विचार करणे, दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आवश्यक आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मलेशियाचे पंतप्रधान, क्युबाच्या अध्यक्षांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर बिन इब्राहिम आणि क्युबाचे अध्यक्ष मिगेल डियास-कानील बर्मुडेस यांची भेट घेतली. द्विस्तरावरील संबंध अधिक मजबूत करण्यासंबंधी या नेत्यांमध्ये चर्चा झाली. पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम यांचे मोदींनी आभार मानले. क्युबाबरोबर औषधनिर्माणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पारंपरिक औषधे आणि डिजिटल पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांमध्ये परस्परसंबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली.